What are Cluster Bombs and How do they Work? : इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या काही दिवासांपासून संघर्ष सुरू आहे. यादरम्यान १९ जून रोजी इस्रायलवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमुळे ‘क्लस्टर बॉम्ब’ यांच्याबद्दल नवीन चिंता निर्माण झाली आहे. हे बॉम्ब सामान्य नागरिकांना अत्यंत गंभीर इजा पोहोचवण्यासाठी ओळखले जातात. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF)ने पुष्टी केली आहे की, सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये किमान एकामध्ये तर क्लस्टर बॉम्ब वॉरहेड होते. याबरोबरच चालू संघर्षामध्ये अशा प्रकारचा दारूगोळा वापरला जाण्याची पहिल्यांदाच नोंद झाली आहे.
क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय?
क्लस्टर बॉम्ब हे एक प्रकारचे शस्त्र आहे, ज्यामधून अनेक लहान बॉम्ब किंवा ‘सबम्युनिशन्स (submunitions)’ विस्तृत भागावर टाकले जातात. एकदाच स्फोट होण्याऐवजी हा बॉम्ब हवेत असतानाच उघडतो आणि विसृत भागात विखुरन अनेक लहान-लहान स्फोट घडवून आणतो.
इराणने १९ जून रोजी केलेल्या हल्ल्यादरम्यान इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, मध्य इस्रायलमध्ये मिसाईल वॉरहेडचा जमिनीपासून ७ किलोमीटर उंचीवर स्फोट झाला, यामधून जवळपास २० सबम्युनिशन्स ८ किलोमीटरच्या कक्षेत विखुरले गेले. हे म्युनिशन्स गायडेड किंवा सेल्फ प्रोपेल्ड नसतात. तर ते फक्त जमिनीवर पडतात आणि जेव्हा ते अदळतील तेव्हा त्यांचा स्फोट होणे अपेक्षित असते.
क्लस्टर बॉम्ब वादग्रस्त का आहेत?
युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर हा वादग्रस्त राहिला आहे, यामागे काही कारणे देखील आहे. पहिलं कारण म्हणजे हे बॉम्ब वापरले गेले की यातून कोणाचीच सुटका होत नाही, त्या भागात असलेल्या शत्रू राष्ट्राच्या सैनिकांबरोबर नागरिकांना देखील यामुळे धोका होऊ शकतो. तसेच स्फोट न झालेले लहान बॉम्ब सुटतात आणि ते दीर्घकाळ सक्रिय राहू शकतात, यामुळे याची कल्पना नसल्याने त्याच्या संपर्कात येऊन नागरिकांना इजा होऊ शकते.
१९ जूनच्या हल्ल्यात काय नुकसान झालं?
इराणने डागलेल्या श्रेपणास्त्रातील क सबम्युनिशन हे मध्य इस्रायलमध्ये असलेल्या अझोर शहरातील एका घरावर येऊन आदळले, यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले, असे वृत्त द टाइम्स ऑफ इस्रायलने दिले आहे. या हल्ल्यात कोणतीही जिवितहनी झाल्याचे अद्याप वृत्त नाही.
इस्रायलच्या होम फ्रंट कमांडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी एक नागरी सुरक्षेसंबंधी मार्गदर्शक सूचना जारी केल्या, ज्यामध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. “आज सकाळी आम्ही तुलनेने विसृत क्षेत्रात लहान म्युनिशन्स पसरवू शकेल असा क्षेपणास्त्र हल्ला अनुभवला. यानंतर काही म्युनिशन्स जमिनीवर पडलेले असण्याची आणि त्यांचा स्फोट न होण्याची शक्यता आहे. कोणत्याही अशा पडलेल्या वस्तूला किंवा संशयास्पद वस्तूला हात लावू नका. ताबडतोब १०० वर कॉल करा.”
क्लस्टर बॉम्ब आणि पारंपरिक क्षेपणास्त्रे यांच्यात फरक काय?
बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा एकाच केंद्रीत ठिकाणी स्फोट होतो, तर क्लस्टर बॉम्ब हे विस्तृत भागात स्फोट घडवून आणण्यासाठी तयार केले जातात. इस्त्रायली लष्कराच्या एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इस्रायलशी बोलताना सांगितले की, यामधील फक्त एक म्युनिशन कमी शक्तिशाली असले तरी अशा प्रकारचे क्षेपणास्त्र इराणच्या इतर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र वॉरहेडपेक्षा अधिक विस्तृत भागाला धोका ठरू शकते शकते.
लोकसंख्या जास्त असलेल्या भागात हे अधिक धोकादायक ठरू शकते, कारण येथे हे सामान्य नागरिकांना, घरांना किंवा पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकते.
क्लस्टर बॉम्बवर बंदी आहे का?
२००८ कन्वेन्शन ऑन क्लस्टर म्युनिशन या आंतरराष्ट्रीयय करारानुसार, क्लस्टर बॉम्ब एकत्र जमा करणे, त्यांची वाहतूक करणे आणि त्यांचे उत्पादन करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. या करारावर १११ देशांनी आणि १२ इतरांनी या स्वाक्षरी केली आहे. पण इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यासारख्या लष्करी शक्तींना करारात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
अमेरिकेने २०२३ मध्ये रशियाविरोधात लढण्यासाठी मदत म्हणून युक्रेनला क्लस्टर बॉम्ब पुरवल्याचे सांगितले जाते. तर रशियीने देखील युद्धात क्लस्टर बॉम्ब वापरल्याचे युक्रेनने म्हटले आहे. इराण आणि इस्रायलप्रमाणे अमेरिका आणि रशिया दोघांनीही या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे.