Gen Z ही संकल्पना गेल्या काही वर्षांत बरीच प्रचलित झाली आहे. साधारणपणे २००० नंतर जन्माला आलेल्या आणि सध्या विशीत असलेल्या तरुणाईला Gen Z म्हणजेच Generation Z असं म्हटलं जातं. या गटातील युवक-युवतींचा आयुष्याबद्दल असलेला दृष्टीकोन, त्यांचे प्राधान्यक्रम, त्यांची कामाची पद्धती याबद्दल बरंच बोललं, लिहिलं, सांगितलं किंवा दाखवलंही गेलं आहे. पण आता याच गटातील तरुणाईबाबत एक महत्त्वाचा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे. यानुसार या गटातील इतर सर्व वयोगटांपेक्षा सर्वात जास्त दु:खी असतात!

plos.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात अॅलेक्स ब्रायसन व डेविड जी. ब्लँचफ्लॉवर या संशोधकांनी त्यांचे निष्कर्ष मांडले आहेत. या अभ्यासासाठी ४४ देशांमधील १२ ते २८ वयोगटातील तरुणांना प्रातिनिधिक स्वरुपात सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले. यामध्ये अमेरिका व इंग्लंडमधील तरुणांचादेखील समावेश होता. या अभ्यासानुसार जेनझीमधील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंता व दु:खी भावना असल्याचं दिसून आलं. आत्तापर्यंत मध्यमवयीन व्यक्तींमध्ये ही लक्षणे दिसत होती, आता मात्र हा ट्रेंड बदलला असून Gen Z गटामध्ये ही लक्षणे दिसू लागली आहेत.

काय आहेत यामागची कारणे?

सदर अभ्यासात Gen Z गटातील तरुणांमध्ये दु:खी असण्यामागील तीन प्रमुख कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

१. मानसिक आरोग्याची समस्या

Gen Z गटातील तरुणांमध्ये विशीत असताना प्रचंड मानसिक तणाव निर्माण होत असल्याचं आकडेवारीत दिसून आलं आहे. त्यानुसार तरुणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचं प्रमाण १९९३ मध्ये २.५ टक्के होतं ते २०२३ मध्ये ६.६ टक्के इतकं वाढलं आहे. त्याचवेळी तरुणींमध्ये हे प्रमाण ३.२ टक्क्यांवरून थेट ९.३ टक्क्यांवर गेलं आहे.

२. बाह्य जगातील घडामोडींचे तणाव

Gen Z तरुणांवर बाह्य जगतातील वेगळ्या प्रकारचे तणाव जाणवतात, जे मध्यमवयीन व्यक्तींवर दिसत नाहीत. त्यामध्ये सोशल मीडियाच्या युगात लहानाची मोठी होणारी पहिली पिढी असणे, करोनाच्या लॉकडाऊनमध्ये आयुष्याची महत्त्वाची वर्षं बंदिस्त होणे, वैयक्तिक कर्जांचं वाढतं प्रमाण अशा काही तणावांचा यात समावेश आहे.

३. स्मार्टफोन

बहुतांश Gen Z साठी स्मार्टफोन म्हणजे जीव की प्राणच जणू! ही पिढी जणूकाही मोबाईलवरच जगतेय. पण हाच स्मार्टफोन या पिढीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू लागला आहे. सदर अभ्यासानुसार वाढत्या स्क्रीनटाईमचा फक्त मानसिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर त्याचे इतरही काही परिणाम होतात. डेविड ब्लँचफ्लॉवर यांच्यामते ही एक जागतिक समस्या बनू लागली आहे. त्यावर उपाय करायचे असतील, तर शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंदी, मोबाईलऐवजी प्रत्यक्ष भेटीगाठींमधून संपर्क वाढवणे असे काही उपाय करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.