Pm Narendra Modi and Vladimir Putin : रशिया-युक्रेनमध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष अद्यापही सुरू आहे. रशिया युक्रेनवर हल्ले करत आहे, तर युक्रेनही रशियाला जशास तसं उत्तर देत आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या मध्यस्थीला अद्याप यश आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची १५ ऑगस्ट २०२५ रोजी अमेरिकेच्या अलास्कामध्ये भेट झाली. या भेटीत रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा निघण्याची अपेक्षा होती. पण अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सूचक भाष्य केलं होतं. “रशियाबाबत मोठी प्रगती, संपर्कात रहा”, अशा आशयाची पोस्ट ट्रम्प यांनी केली होती. त्यामुळे पुतिन आणि ट्रम्प यांच्या भेटीत काही सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, असं असताना आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधत युक्रेनच्या प्रश्नाबाबत अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीचा वृत्तांत शेअर केला आहे.

व्लादिमीर पुतिन यांनी संपर्क करत संवाद साधल्यानंतर त्यांचे आभार मानताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनैतिक आणि संवादाद्वारे संघर्षाचे शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी भारताची भूमिका अधोरेखित केली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला की भारत या संदर्भातील सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो. या बरोबरच भारत आणि रशियामधील विशेष धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवरही चर्चा केल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं?

व्लादिमीर पुतिन यांनी संपर्क साधल्याबाबत पंतप्रधान मोदींनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, “माझे मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद झाला. पुतिन यांनी त्यांच्या अलास्का येथील ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल वृत्तांत शेअर केला, त्याबद्दल त्यांचे आभार. युक्रेन आणि रशिया संघर्षात भारताने शांततापूर्ण तोडग्याचं सातत्यानं आवाहन केलं आहे. या संदर्भात होत असलेल्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या काळात आमच्या सततच्या देवाणघेवाणीची मी अपेक्षा करतो”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

दरम्यान, पंतप्रधान मोदींशी पुतिन यांच्या फोन कॉलपूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं होतं की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का येथे झालेल्या शिखर बैठकीचं भारत स्वागत करतो. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं होतं की, “शांततेच्या प्रयत्नात त्यांचं नेतृत्व अत्यंत कौतुकास्पद आहे. शिखर परिषदेत झालेल्या चर्चेचं भारत कौतुक करतो. पुढे जाण्याचा मार्ग केवळ संवाद आणि राजनैतिक असू शकतो. जगाला युक्रेनमधील संघर्ष संपल्याचं पाहायचं आहे.”