भारताने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या या निर्णयाबद्दल सातत्याने रोष व्यक्त केला जात आहे. दोन्ही देशांमध्ये या मुद्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झालेले असताना, सोमवारी या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जवळपास अर्धातास फोनवर चर्चा केली. मोदींनी ट्रम्प यांच्याशी याबाबत चर्चा केल्याने एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

या चर्चेवर टिप्पणी करताना असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे की, आम्ही फार अगोदरपासून सांगत आलो आहे की, काश्मीर द्विपक्षीय मुद्दा आहे. यावर भारताची सातत्याने स्थिर भूमिका होती. मग पंतप्रधान मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून याबाबत तक्रार करण्याची काय आवश्यकता होती?

विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी यांचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी यासंदर्भात बोलणे झाल्यानंतर ट्रम्प यांनी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फोनकरून दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी बोलताना संयम पाळा, अशा शब्दात समज दिली होती.

चर्चेवेळी मोदी यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख करणेही टाळले होते. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर तणाव निर्माण होईल अशा पद्धतीनेच भडक विधाने केली जात असल्याचे मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितले होते. दोन्ही नेत्यांमध्ये क्षेत्रीय शांततेशिवाय द्विपक्षीय मुद्यांवर देखील यावेळी चर्चा झाली होती. तसेच, काही नेत्यांकडून भारताविरोधी भडकाऊ भाषणं केली जात आहेत. ज्यामुळे प्रदेशातील शांततेला बाधा निर्माण होत आहे. अशा वातावरणात सीमेपलिकडच्या दहशतवादाला कोणताही थारा देऊ नये, असेही मोदींनी म्हटले होते.