Donald Trump Tarrif : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा जगातील अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. डोनाल्ड ट्रम्प कायम कोणत्या न कोणत्या कारणांवरून चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी पुन्हा एक मोठी घोषणा करत भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली होती. त्यामुळे अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचलेलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाचा भारताला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प प्रशासनाने भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागलेलं आहे. हे अतिरिक्त टॅरिफ २७ ऑगस्टपासून भारतावर लागू होणार आहे. आता भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी राहिले आहेत. त्याआधी आता भारत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानुसार २७ ऑगस्टपासून भारतावर ५० टक्के आयातशुल्क लागू होणार आहे. त्यामुळे या संदर्भात भारताची भूमिका काय असणार? यावर चर्चा करण्याच्या अनुषंगाने मंगळवारी (२६ ऑगस्ट) पंतप्रधान कार्यालयाने एक उच्चस्तरीय बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत भारत महत्वाचे काही निर्णय़ घेण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, अमेरिकेत भारतीय वस्तूंवर ५० टक्के आयातशुल्क आकारणीचा सामना करणाऱ्या भारतीय निर्यातदारांसाठी उपाययोजनांचा आढावा घेण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने २६ ऑगस्ट रोजी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षेखाली ही बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत भारत कोणता मोठा निर्णय घेणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.
भारताने अमेरिकेला दिलं होतं सडेतोड उत्तर
ट्रम्प यांनी अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्काच्या घोषणेनंतर भारताने प्रतिक्रिया देत अमेरिकेला याआधीही ठणकावलं होतं. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचं भारताने म्हटलं होतं. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत ही प्रतिक्रिया दिली होती. रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं होतं की, “इतर अनेक देशांनी स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही पुन्हा सांगतो की ही कृती अन्यायकारक आणि अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल”, असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं होतं.