व्हॉट्स अॅपवर दुसऱ्याने फॉरवर्ड केलेल्या मेसेजमुळे मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील जुनैद खान हा २१ वर्षीय युवक मागच्या पाच महिन्यांपासून तुरुंगवास भोगत आहे. व्हॉट्स अॅपच्या धोरणानुसार मूळ अॅडमिनने ग्रुप सोडल्यानंतर त्याच्या जागी दुसरी व्यक्ती अॅडमिन बनते. त्याचीच किंमत आमच्या मुलाला चुकवावी लागत आहे असे जुनैदच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. मूळ अॅडमिनने व्हॉट्स अॅपवरुन वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यानंतर ग्रुप सोडून दिला. त्यानंतर त्याच्याजागी जुनैद खान ग्रुप अॅडमिन बनला.
राजगडच्या तालेन शहरात राहणारा जुनैद बीएससीचा विद्यार्थी आहे. त्याला यावर्षी १४ फेब्रुवारीला आयटी कायद्याच्या कलम १२४ अंतर्गत राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. जुनैद ज्या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये होता. त्या ग्रुपच्या अॅडमिनने वादग्रस्त पोस्ट फॉरवर्ड केली होती. या पोस्ट विरोधात काही स्थानिकांनी तालेन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरुन कारवाई केली तेव्हा जुनैद ग्रुप अॅडमिन होता.
जेव्हा ही वादग्रस्त पोस्ट शेअर केली तेव्हा जुनैद ग्रुपमध्ये होता पण तो अॅडमिन नव्हता. तो एका कौटुंबिक कामासाठी रतलाम येथे होता. ही वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर मूळ अॅडमिनने ग्रुप सोडला. त्यानंतर त्याच्याजागी दुसरा अॅडमिन बनला पण त्याने सुद्धा ग्रुप सोडला. मग त्याजागी जुनैद ग्रुपचा अॅडमिन झाला. जेव्हा पोस्ट शेअर झाली तेव्हा जुनैद अॅडमिन नव्हता असे जुनैदचा चुलत भाऊ फारुख खान याने सांगितले.
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यामुळे कोर्टाने जुनैदला जामीन नाकारला. त्यामुळे त्याला परिक्षेलाही बसता आले नाही. आम्ही मुख्यमंत्री हेल्पलाईन आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पण त्याचा काही उपयोग झालेला नाही असे फारुखने सांगितले. जेव्हा जुनैदला अटक झाली तेव्हा त्याचे कुटुंबिय काही बोलले नाहीत. आता हा विषय कोर्टात गेलाय तेव्हा जुनैद डिफॉल्ट अॅडमिन असल्याचे त्याचे कुटुंबिय सांगत आहेत. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते कोर्टात सादर करावेत असे पाचोरे पोलीस स्टेशनचे युवराज सिंह यांनी सांगितले.