पाकिस्तानात पीठ वाटपावेळी चेंगराचेंगरी, दोन दिवसांत ११ ठार

पाकिस्तान सरकारने गरीबांना गव्हाचे पीठ मोफत देण्याची योजना आणल्यानंतर वितरण केंद्रांवर चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत.

dv pakistan rush
पाकिस्तानात पीठ वाटपावेळी चेंगराचेंगरी, दोन दिवसांत ११ ठार

लाहोर : पाकिस्तान सरकारने गरीबांना गव्हाचे पीठ मोफत देण्याची योजना आणल्यानंतर वितरण केंद्रांवर चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत. यात गेल्या दोन दिवसांत एकटय़ा पंजाब प्रांतात किमान ११ जणांचा बळी गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. इम्रान खान यांना वाढत्या पाठिंब्याला आळा घालण्यासाठी आधीच कर्जबाजारी झालेल्या शहाबाज शरीफ सरकारने काही दिवसांपूर्वी मोफत पीठ योजना जाहीर केली. त्यानंतर महागाईशी झगडणारी पाकिस्तानी जनता वितरण केंद्रांवर गर्दी करत आहे.

त्यामुळे पंजाब प्रांतातील साहिवाल, बहावलपूर, मुझफ्फरगढ, ओकारा, जेहानैन आणि मुलतान या जिल्ह्यांमध्ये चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. तर गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावाही करण्यात येत आहे. मुझफ्फरगढ आणि रहीम यार खान या शहरांमध्ये वितरण केंद्रे लुटण्याचे प्रकारही घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनांनंतर पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसिन नक्वी यांनी वितरण केंद्रे पहाटे सहा वाजता उघडण्याचा निर्णय घेतला असून पंतप्रधान शरीफ यांनीही सर्व प्रांत सरकारांना काळजी घेण्याची सूचना केली आहे.

इम्रान यांच्यावर माफी मागण्यासाठी दबाव

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान जोपर्यंत  चुका मान्य करत नाहीत आणि जाहीरपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत सरकार आणि त्यांच्यात  चर्चा होणार नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले. ‘जिओ न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार शरीफ यांनी ‘नॅशनल असेंब्ली’ला संबोधित करताना खान यांना ‘देशद्रोही’ संबोधले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 01:05 IST
Next Story
अदानी उद्योग समूहात २० हजार कोटींची गुंतवणूक करणारा चिनी नागरिक कोण?, काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांचा सवाल
Exit mobile version