चंदीगडमधील रस्त्यांवर सोमवारी एका काळविटाने अक्षरश: धुमाकूळ घातला. या घाबरलेल्या आणि जखमी काळवीटामुळे शहरातील वाहतुकीचा तब्बल तीन तास खोळंबा झाला होता. या सगळ्या धुमाकुळीत या काळविटाने एका वाहनाची काच फोडली आणि दोन व्यक्तींना किरकोळ जखमीही केले. येथील सुखना अभयअरण्यातून हे काळविट शहरात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल साधारण सकाळी ११च्या सुमारास येथील उच्च न्यायालयाच्या परिसरात सर्वप्रथम हे काळविट दृष्टीस पडले. याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर वनखात्याचे अधिकारी या पाच फुटी काळविटाला पकडण्यासाठी घटनास्थळी आले. मात्र, वनखात्याचा काळविटाला पकडण्याचा पहिला प्रयत्न फसला. त्यानंतर सगळ्यांना चकवा देत या काळविटाने थेट रस्त्यावर धाव घेतली. यावेळी काळविटाने दोन रिक्षांना टक्कर दिली. यामध्ये रिक्षात बसलेला एक प्रवासी जखमी झाला. यावेळी काळविटाच्या तोंड, मान आणि अंगावर जखमा असल्याचे वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, हे काळविट शहरातील सेक्टर २१ च्या परिसरात असणाऱ्या झुडूपांजवळ जाऊन बसले. मात्र, याठिकाणी बघ्यांच्या गर्दीमुळे भेदरलेल्या या काळविटाने सेक्टर १८ मध्ये मोर्चा वळवला. याठिकाणी वनाधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा काळविटाला पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. याठिकाणाहून पळ काढल्यानंतर हे काळविट हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाल यांच्या निवासस्थानाजवळच्या परिसरात जाऊन पोहचले. यावेळी काळविटाने डोके आपटून तेथे असणाऱ्या एका वाहनाची काच फोडली. याशिवाय, या काळविटाने दुचाकीवरून जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला धक्का मारून खाली पाडले. त्यानंतर साधारण दुपारी दोनच्या सुमारास वनखात्याला या काळविटाला पकडण्यात यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onअपघातMishap
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When a stag ran wild in chandigarh for three hours
First published on: 26-01-2016 at 13:56 IST