Rohit Pawar On Clash Between Chhava Sanghatna And NCP: कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवन परिसरात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचाही समावेश आहे.

दरम्यान, या मारहाणीवर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, “राज्यातला शेतकरी प्रचंड संकटात असताना, राज्याचे कृषिमंत्री सभागृहात रमीचे पत्ते फेकत असतील, तर जनतेत संतापाचा आगडोंब उसळणारच आहे.”

“या विषयावर लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे साहेबांना निवेदन देत असताना झालेला वाद दुर्दैवी आहे. तटकरे साहेबांवर अशा प्रकारे पत्ते फेकणे चुकीचेच आहे, परंतु त्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना करण्यात आलेली मारहाण अधिक चुकीची आहे”, असे रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे.

पोस्टच्या शेवटी रोहित पवार म्हणाले की, “लोकांनी प्रश्न विचारले की आम्ही फटके देऊ, हाणामारी करू आणि विरोध चिरडून टाकू हा संदेश सत्ताधारी देऊ पाहत आहेत का?”

काय आहे प्रकरण?

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा काल एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कोकाटे मोबाईलमध्ये पत्ते खेळत असल्याचे दिसत आहे. यावरून त्यांच्यावर राज्यभरातून जोरदार टीका होत आहे. अशात आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना दिले.

निवेदन देताना छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणही मारहाण करत असल्याचे दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छावा संघटनेचे पदाधिकारी काय म्हणाले?

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन देताना छावा संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की, “त्यांना हे पत्ते द्यावे आणि घरी बसून खेळायला सांगावे. विधानभवन हे शेतकरी, कष्टकरी आणि राज्यातील जनतेसाठी कायदे करण्यासाठीचे सभागृह आहे. तिथे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे. ती पत्ते खेळण्याची जागा नाही. ते तुमच्या पक्षाचे आमदार आहेत, त्यांना तुम्ही मंत्री केले आहे. अशा मंत्र्यांना पदावर ठेऊ नका, यामुळे तुमच्या पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे.”