मोबाइल चोरीला गेल्यानंतर त्यामधील आयएमईआय नंबरद्वारे पोलीस सदर मोबाइलचा माग काढतात. चोरीला गेलेल्या मोबाइलमध्ये नवीन सिम कार्ड टाकल्यानंतर त्याची माहिती सायबर पोलिसांना मिळत असते. पण स्मार्टफोन चोरणारे चोरही आता स्मार्ट झाले आहेत. दिल्लीत चक्क IMEI नंबर बदलणारी टोळी आढळून आली आहे. चोरलेल्या मोबाइलचे IMEI नंबर बदलणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना अटक केल्यानंतर हा घोटाळा समोर आला आहे. ही टोळी पश्चिम दिल्लीमध्ये कार्यरत असून मोबाइल चोरांना मदत करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नरबजीत सिंग (२६), मनीष सिंग (२३) आणि गुरमीत सिंग (३२) अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही टिळक नगर येथील राहणारे आहेत. पोलिसांनी या टोळक्याकडून ७९ मोबाइल फोन आणि लॅपटॉप हस्तगत केले आहेत. या लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर आणि इतर डेटा आढळून आला. IMEI नंबर बदलल्यामुळे दाखल झालेल्या एफआयआरनुसार मोबाइलचा शोध लावणे पोलिसांसाठी दुरापास्त होते. पश्चिम दिल्लीमध्ये दाखल झालेल्या चार एफआयआरशी या टोळक्याचा संबंध जोडण्यास पोलिसांना यश आले आहे. जप्त केलेल्या इतर फोनचे मालक शोधण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून केला जात आहे.

दिल्लीनंतर पुणे पोलिसांचा सांगलीत छापा, आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचे मेफेड्रोन जप्त

टाइम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत चोरी होणारे बहुसंख्य मोबाइल शोधण्यात पोलिसांना अपयश आले. कारण त्यांचे आयएमईआय नंबर बदलल्यामुळे मोबाइलचा माग काढता येत नव्हता. यामुळे पोलिसही चिंतेत होते. पोलिसांच्या अधिकृत नोंदीद्वारे चोरी झालेल्यांपैकी अतिशय कमी मोबाइल शोधण्यात यश येत होतं. पोलिसांनी जेरबंद केलेली टोळी, आयएमईआय नंबर बदलण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरचा वापर करत होती. त्यानंतर हे मोबाईल काळ्या बाजारात वापरलेले मोबाइल म्हणून विकत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिस उपनिरीक्षक अमित यांच्या पथकाला सदर टोळीच्या व्यापाराबाबतची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून टोळीला जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी नरबजीतने सांगितले की, आरोपी गुरमीत हा चोरी केलेले मोबाइल चोरांकडून जमा करून आणायचा. त्यानंतर नरबजीत सॉफ्टवेअरच्या मदतीने त्या मोबाइलचे आयएमईआय नंबर बदलायचा. पोलीस उपायुक्त विचित्र वीर यांनी सांगितले की, आता आम्ही हे मोबाइल कुठे विकले जायचे, याचा शोध घेत आहोत.