काँग्रेस नेत्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली तेव्हा छत्तीसगड सरकार कुठे होते असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारत रमणसिंह सरकारवर टीकास्त्र सोडले.
नक्षलवादी कारवायांचा सर्वाधिक फटका बसलेल्या बस्तर विभागात राहुल गांधी आदिवासी अधिकार महासंमेलनाच्या माध्यमातून छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसमध्ये मोठय़ा प्रमाणात असलेल्या गटबाजीचा फायदा घेत सलग दहा वर्षे या राज्यात भाजप सत्तेवर आहे. काँग्रेस यावेळी सत्तेत येईलअसा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणात त्यांनी नक्षलवाद्यांच्या हल्यात राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते बळी पडल्याचा मुद्दा उपस्थित केला. २५ मे रोजी नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल तसेच त्यांचे पुत्र दिनेश आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते महेंद्र कर्मा, विद्याचरण शुक्ला यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच आपण छत्तीसगडला आलो. अनेकांनी आपण जाऊ नये असा सल्ला दिला. मात्र लोकांचा आवाज दडपला जात आहे. ते आपण कदापी होऊ देणार नाही असे राहुल यांनी सांगितले. लोकांना अधिकार देण्यावर काँग्रेसचा विश्वास आहे. तर विरोधक मात्र केवळ एक, दोघांसाठीच सत्ता हवी आहे असा आरोप केला. आदिवासी युवकांनी राजकारणात सामील व्हावे, राहुल गांधी तुमच्या पाठिशी आहेत असा दिलासा त्यांनी दिला. केंद्र सरकारने राबवलेल्या अन्न सुरक्षा तसेच भू संपादन विधेयक याची माहिती सभेत दिली. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी या सभेच्या निमित्ताने एकी दाखवण्याचा प्रयत्न केला. दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती.