मलेरियामुळे दरवर्षी जगभरात तब्बल ४,००,००० जणांचा मृत्यू होतो. यात आफ्रिकन देशांमधील लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. अशा या जीवघेण्या मलेरिया आजारावरील जगातील पहिल्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिलीय. RTS S/AS01 असं या मलेरिया लसीचं नाव आहे. यामुळे मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण राखण्यात यश येणार आहे.

विशेष म्हणजे मलेरियाचे सर्वाधिक बळी आफ्रिकन देशांमध्ये जातात. सामान्यपणे दर मिनिटाला एका लहान मुलाचा मलेरियामुळे जीव जातो. जगातील एकूण मृत्यूंपैकी अर्धे मृत्यू केवळ ६ आफ्रिकन देशांमध्ये होतात. यातील एक तृतीयांश मृत्यू एकट्या नायजेरियात होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१९ मधील आकडेवारीनुसार हे स्पष्ट झालंय.

२०१९ पासून २० लाख डोसची चाचणी आणि अभ्यास

औषध कंपनी जीएसकेने (GSK) १९८७ मध्ये तयार केलेल्या या लसीचे घाना, केनिया आणि मलावी या देशांमध्ये २०१९ पासून २० लाख डोस देण्यात आले. त्यांचं परिक्षण केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला अखेर व्यापक वापरासाठी मान्यता दिलीय. तसेच सहारन आफ्रिकन देशांमधील लहान मुलांवर या लसीच्या वापराची शिफारस केलीय. २ वर्षांपर्यंतच्या मुलांना या लसीचे ४ डोस देण्यात येणार आहेत.

हेही वाचा : आज जागतिक मच्छर दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

परपोषी डासांवरील ही पहिलीच लस

सध्या जगात विषाणू आणि जीवाणूविरोधात अनेक लसी उपलब्ध आहेत. मात्र, परपोषी डासांवरील ही पहिलीच लस आहे जिला जागतिक आरोग्य संघटनेने व्यापक वापरासाठी मान्यता दिलीय. ही लस मलेरियाच्या ५ प्रजातींपैकी प्लास्मोडीयम फाल्सीपॅरम या एका परपोषी प्रजातीवर प्रभावी आहे. हीच प्रजाती ५ पैकी सर्वात घातक आहे. ही लस निर्मिती मलेरियावर नियंत्रणासाठी खूप महत्त्वाची असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलं.

मलेरियाविरोधातील लढ्याला चांगलीच बळकटी

एप्रिलमध्ये ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी त्यांची मॅट्रीक्स-एम (Matrix-M) ही लस ७५ टक्क्यांपेक्षा अधिक परिणामकारक असल्याचं सांगितलं. त्यानंतर मलेरियाविरोधातील लढ्याला चांगलीच बळकटी मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलेरिया परपोषींच्या इतर प्रजातींवरही लस निर्मितीला मदत होणार

जर्मनीची बायोएनटेक कंपनीने देखील पुढील वर्षीपासून मलेरियावरील लसींच्या चाचणीला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली ही लस त्यांच्या आरएनए (mRNA) तंज्ञावर आधारित असेल. याकंपनीने आधी अमेरिकेच्या फायझरसोबत मिळून कोरोना लसही तयार केलीय. या नव्या घडामोडींमुळे वैज्ञानिकांना मलेरियावरील आणखी लसी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेला आहे. यामुळे मलेरिया परपोषींच्या इतर प्रजातींवर देखील लस तयार व्हायला मदत होईल.