S. Jaishankar Slams Critics Of Russian Oil Purchases: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी रशियासोबतच्या भारताच्या ऊर्जा व्यापाराचे समर्थन केले आणि म्हटले की, भारताची रशियाकडून सुरू असलेली तेल खरेदी राष्ट्रीय आणि जागतिक हितासाठी आहे. इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममध्ये बोलताना त्यांनी अधोरेखित केले की, अमेरिकेसोबतच्या चर्चेत व्यापार हा ‘अडथळा मुद्दा’ राहिला असला तरी भारत आपले निर्णय स्वतंत्रपणे घेत राहील.

यावेळी भारतावर रशियन तेल खरेदी करतो म्हणून टीका करणाऱ्यांना उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, “अमेरिकेतील व्यवसायपूरक प्रशासनासाठी काम करणारे काही लोक इतरांवर नफ्यासाठी व्यापार करत असल्याचा आरोप करत आहेत, हे गंमतीशीर आहे. जर तुम्हाला भारताकडून तेल किंवा तेलप्रक्रिया केलेली उत्पादने खरेदी करण्यात अडचण असेल, तर खरेदी करू नका. यासाठी तुम्हाला कोणीही जबरदस्ती केली नाही. तुम्हाला नको असेल, तर खरेदी करू नका.”

यावेळी जयशंकर यांनी नमूद केले की, २०२२ मध्ये जेव्हा तेलाच्या किमती वाढल्या तेव्हा जागतिक स्तरावर चिंता होती. “२०२२ मध्ये, तेलाच्या किमती वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र चिंता होती. त्या वेळी, असे म्हटले जात होते की, जर भारताला रशियन तेल खरेदी करायचे असेल तर ते खरेदी करू द्या, कारण त्यामुळे किंमती स्थिर होतील”, असे ते पुढे म्हणाले.

जयशंकर म्हणाले की, भारताची खरेदी आंतरराष्ट्रीय तेल बाजारपेठ स्थिर करण्यासाठी देखील होती. “आम्ही तेलाच्या किमती स्थिर करण्यासाठी तेल खरेदी करत आहोत. हो, ते आमच्या राष्ट्रीय हिताचे आहे पण ते जागतिक हिताचेही आहे”, असेही त्यांनी सांगितले.

अलास्का बैठकीनंतर रशिया दौऱ्यात झालेल्या चर्चेत भारताच्या रशियाशी असलेल्या संबंधांवर जयशंकर म्हणाले की, “आम्हाला रशियासोबत व्यापार वाढवायचा आहे. भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे आणि आम्हाला रशिया-युक्रेन समस्येचा लवकरात लवकर निकाल हवा आहे.”

जयशंकर म्हणाले की, अमेरिका आणि चीनसारख्या प्रमुख शक्तींसोबत भारताचे सहकार्य आणि वाद दोन्ही पाहायला मिळाले आहे, परंतु एकूणच वाटचाल सकारात्मक राहिली आहे. “सध्या काही मुद्दे आहेत, ते खुले आहे, परंतु असे नाही की आपल्याकडे यापूर्वी कधीही समस्या आल्या नव्हत्या”, असेही ते म्हणाले.