Leela Sahu Madhya Pradesh: मध्य प्रदेशमधील २२ वर्षांची सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर लिला साहू सध्या चर्चेत आहे. लिलाने २०२२ मध्ये तिच्या स्थानिक पातळीवरचे विषय व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यास सुरुवात केली. ग्रामीण संस्कृती, जत्रा आणि गावातील दैनंदिन जीवनाबद्दल ती माहिती देत असते. युट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर ती चांगलीच प्रसिद्ध असून तिचे २३ लाख फॉलोअर्स आहेत. मात्र आता स्थानिक भाजपा नेत्यांशी तिचा वाद सुरू असून भाजपाचे खासदार एका वेगळ्याच कारणामुळे अडचणीत आले आहेत.
गावातील हलके फुलके विषय व्हिडीओच्या माध्यमातून मांडणाऱ्या लिला साहूने २०२४ साली स्थानिक पातळीवरील सामाजिक विषयांना हात घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि सिधी जिल्ह्याचे खासदार राजेश मिश्रा यांना तिने थेट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
लिला साहू गर्भवती राहिल्यापासून ती आणि तिचे कुटुंबिय स्थानिक पुढाऱ्यांची भेट घेत आहेत. गावातील रस्ता बनवावा जेणेकरून गावातील लोकांची सोय होईल, यासाठी त्यांनी अनेकदा निवेदन दिले. पण काहीच हालचाल न झाल्यामुळे लिला साहूने व्हिडीओच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडली. “आमच्या गावातील रस्त्यासाठी अनेकदा सर्व्हे झाला. त्यानंतर पाऊस आला आणि गेला, हिवाळा आणि ऊन्हाळाही येऊन गेला. यावर्षी पुन्हा पाऊस सुरू झालाय. मात्र रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे”, या शब्दात लिलाने रस्त्याची दुरवस्था कथन केली.
सिधी जिल्ह्यातील खड्डी खुर्द येथील रहिवाश्यांना मूलभूत आरोग्यसेवेसाठी ८ किलोमीटरचा कच्च्या रस्त्यावरून ट्रॅक्टरने प्रवास करावा लागतो. यामुळे लिला साहूच्या व्हिडीओला सिधी जिल्ह्यात अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली. यानंतर भाजपा खासदार राजेश मिश्रा यांनी या व्हिडीओची दखल घेऊन त्याला उत्तर देताना नाहक वाद ओढवून घेतला.
आम्ही तिला उचलू
राजेश मिश्रा माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महिलांच्या प्रसूतीच्या तारखेचा अंदाज आधीच वर्तवलेला असतो, त्यामुळे आम्ही एक आठवडाआधीच त्यांना वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून देऊ. त्यानंतर त्यांनी लिला साहू यांचे नाव न घेता म्हटले, “तिने तारीख सांगावी आम्ही एक आठवडाआधीच तिला उचलू.”
‘तिला आम्ही उचलू’, या विधानावर आता आक्षेप व्यक्त केला जात असून खासदार राजेश मिश्रा यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच रस्त्याच्या कामाबाबतही त्यांनी स्पष्ट सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या रिलनंतर काम करत नाही. प्रशासकीय कामाची एक पद्धत असते.
आता वाद उद्भवल्यानंतर खासदार राजेश मिश्रा यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. ते म्हणाले, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. आम्ही २०२४ सालीच केंद्र सरकारला रस्ता बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला असून त्याची माहिती आम्ही ग्रामस्थांना दिली आहे. १७ महिन्यात येथे पक्का रस्ता बांधून तयार असेल.
मात्र लिला साहू यांना खासदारांचे हे उत्तर मान्य नाही. तिने म्हटले, “माझा नववा महिना सुरू आहे. लवकरच प्रसुतीची तारीख येईल. माझी नणंदही गर्भवती आहे. तसेच आमच्या गावातील जवळपास सहा मुली गर्भवती आहेत. कच्च्या रस्त्यावरून रुग्णालयात जाण्यासाठी काही तास लागतात. आता आम्हाला कळले की, रस्त्यासाठी अजून एक सर्व्हे होणार आहे. माझ्या प्रसुतीनंतर मी थेट दिल्लीला जाणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब टाकणार आहे.”