Arun Yogiraj Ayodhya Temple Ram Idol: अयोध्येतल्या राम मंदिरात २२ जानेवारी या दिवशी रामाची मूर्ती स्थापन करुन प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. रामलल्लाची म्हणजेच बाल रुपातील रामाची मूर्ती मंदिरात असणार आहेच. याशिवाय राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचीही मूर्ती मंदिरात असणार आहे. प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेली मूर्ती या मंदिरातल्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन ठेवली जाणार आहे. अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. आपण जाणून घेऊ हे मूर्तीकार अरुण योगीराज कोण आहेत?

कोण आहेत अरुण योगीराज?

अरूण योगीराज हे कर्नाटकमधल्या मैसूरचे आहेत. त्यांचं घराणंच मूर्तीकारांचं आहे. कारण गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांच्या घरात मूर्ती तयार करण्याचं काम होतं. अरुण योगीराज हे फक्त कर्नाटकातच नाहीत तर देशभरातल्या प्रसिद्ध मूर्तीकारांमधले एक प्रतिथयश मूर्तीकार म्हणून त्यांची गणना होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगीराज यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. अरुण यांना मूर्ती साकारण्याचा वारसा आपल्या घरातूनच मिळाला आहे.

हे पण वाचा- “माझ्या मुलाने घडवलेल्या रामाच्या मूर्तीचं दर्शन करण्यासाठी..”, अरुण योगीराज यांच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

लहानपणापासून मूर्तीकलेची आवड

अरुण योगीराज यांना लहानपणापासूनच मूर्तीकलेची आवड होती. त्यांनी MBA केलं. त्यानंतर ते एका खासगी कंपनीत कामही करत होते. मात्र मूर्तीकला ते विसरले नाहीत. २००८ मध्ये नोकरी सोडून त्यांनी मूर्ती साकारण्याच्या आपल्या पिढीजात व्यवसायातच काम करण्याचा निर्णय घेतला. अल्पावधीतच ते लोकप्रिय मूर्तीकार झाले.

अरुण योगीराज यांनी इंडिया गेट या ठिकाणी बसवण्यात आलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ३० फूट उंचीचा पुतळा साकारला आहे. ही पुतळा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या दिवशी दिल्लीतल्या इंडिया गेट या ठिकाणी बसवण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरुण योगीराज यांनी काय शिल्पं साकारली आहेत?

अरुण योगीराज यांनी केदारनाथ या ठिकाणी आदी शंकराचार्यांचा १२ फूट उंचीचा पुतळाही साकारला आहे. मैसूर या ठिकाणी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची मूर्तीही त्यांनी साकारली आहे. मैसूरच्या राजाचा १४ फुटांचा पुतळाही त्यांनी तयार केला आहे. तर मैसूर या ठिकाणीच त्यांच्या हातातून निर्मिलेली हनुमानाची २१ फुटांची मूर्तीही बसवण्यात आली आहे. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा १५ फूट उंचीचा पुतळाही त्यांनी तयार केला आहे. त्यांची ही कला संपूर्ण देशात पोहचली आहे. देशातल्या नामांकित मूर्तीकारांमध्ये आणि शिल्पकारांमध्ये त्यांचा समावेश होतो.