Who is Kirti Patel: सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या एका इन्फ्लुएन्सरला अहमदाबादमधून अटक झाली आहे. १० महिन्यांपासून इन्फ्लुएन्सर किर्ती पटेल फरार होती. अखेर पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मतदीनं तिला अटक केली. इन्स्टाग्रामवर किर्ती पटेलचे १.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सूरतमधील एका बांधकाम व्यावसायिकाला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तिच्याविरोधात मागच्या वर्षी गुन्हा दाखल झाला होता.
जून २०२४ पासून सूरत पोलीस किर्ती पटेलच्या मागावर होते. अटक टाळण्यासाठी किर्ती गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवर लपत होती. या काळात तिनं अनेक सीम कार्ड बदलले होते. मागच्या वर्षी सूरत पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पाच आरोपींपैकी किर्ती पटेल एक होती. यापैकी चार जणांना आधीच अटक झाली असून तेव्हापासून किर्ती पटेलनं पळ काढला होता.
सूरतच्या झोन १ चे पोलीस उपायुक्त आलोक कुमार यांनी एएनआय वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितलं की, किर्ती पटेलनं बांधकाम व्यावसायिकाकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
Surat Police arrested Kirti Patel for demanding extortion from a businessman a year ago.
— G.s.Banna Official (@GsBannaOfficial) June 18, 2025
Kirti Patel was seen smiling in police custody as if she was not afraid of the police.#Gujarat #GujaratPolice#Surat #SuratPolice #KirtiPatel pic.twitter.com/zMMsFq666U
इन्स्टाग्रामच्या मदतीनं शोध घेण्यात यश
पोलिसांनी सांगितलं की, मागच्या १० महिन्यात किर्ती आपला ठावठिकाणा सतत बदलत होती. तिचे सीम कार्ड्स आणि आयपी ॲड्रेसही सतत बदलत होते. आम्ही इन्स्टाग्राम इंडियाच्या संपर्कात होतो. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिचा शोध घेण्याचा आमचा प्रयत्न होता. यानंतर अहमदाबादच्या सरखेज परिसरात ती लपून बसल्याची माहिती सायबर तज्ज्ञांच्या माध्यमातून आम्हाला समजली.
आलोक कुमार पुढे म्हणाले, सायबर तज्ज्ञ आणि आमच्या तंत्रज्ञान विभागाने अनेक दिवस किर्तीचा माग काढून तिला अहमदाबादच्या सरखेजमध्ये शोधून काढले. आम्ही अहमदाबाद पोलिसांशी समन्वय साधून किर्तीला ताब्यात घेतलं.
किर्ती पटेलच्या विरोधात खंडणी उकळण्याच्या प्रयत्नांशिवाय इतरही अनेक तक्रारी दाखल आहेत. जमीन बळकावण्याचाही तिच्यावर आरोप आहे. आम्ही या सर्व तक्रारींचीही चौकशी करणार असल्याचे पोलीस उपायुक्त कुमार यांनी सांगितले.
किर्ती पटेल कोण आहे?
किर्ती पटेल ही किर्ती अदालिजा या नावानेही ओळखली जाते. गुजराती भाषेतील डिजिटल कंटेट क्रिएटर म्हणून ती लोकप्रिय आहे. फरार असतानाही ती सोशल मीडियावर मात्र सक्रिय होती. या काळात इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर तिनं व्हिडीओ अपलोड केले होते. यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या प्रयागराज येथील महाकुंभ आणि एप्रिल महिन्यात वाढदिवसानिमित्त तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली होती.