Jasmin Jaffar Controversy: केरळच्या गुरुवायूर श्री कृष्ण मंदिरात गैर-हिंदूंना प्रवेश निषिद्ध आहे. तरीही मंदिराच्या नियमांचे उल्लंघन करत मंदिरात प्रवेश करून छायाचित्रण आणि मंदिरातील तलावात पाय धुतल्याबद्दल इन्फ्लुएंसर जॅस्मिन जाफर सध्या वादात अडकली आहे. सध्या हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवरून डिलीट करण्यात आला असला तरी केरळमध्ये मात्र यावरून वाद पेटला आहे. केरळच्या त्रिशूरमधील मंदिर गैर-हिंदूंसाठी निषिद्ध क्षेत्र आहे. येथील तलावातील पाणी मंदिरातील भगवान श्रीकृष्णाला स्नान घालण्यासाठी वापरले जाते. मात्र जॅस्मिन जाफरच्या कृत्यामुळे आता नाराजी पसरली आहे.
या घटनेनंतर गुरुवायूर देवस्थानचे प्रशासक ओ. बी. अरुण कुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
कोण आहे जॅस्मिन जाफर?
जॅस्मिन जाफर ही डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे. युट्यूब चॅनेलद्वारे तिला लोकप्रियता मिळाली. ती युट्यूबवर ब्युटी टिप्स आणि लाइफस्टाइल कंटेंट शेअर करते. आज तिचे युट्यूबवर १६ लाख सबस्क्राइबर आहेत. तसेच इन्स्टाग्रामवर १५ लाख फॉलोअर्स आहेत.
लग्न झाले असतानाही ऑनस्क्रिन प्रेम प्रकरण
यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या बिग बॉस मल्याळमच्या सिझन ६ मध्ये ती दुसरी उपविजेती ठरली होती. या शोमध्ये स्पर्धक गॅबरी जोसशी तिची जवळीक वाढली. जॅस्मीनचे शोपूर्वी अफजल अमीरशी लग्न झाले होते. मात्र ऑनस्क्रिन रोमान्समुळे ती वादात अडकली. नंतर जॅस्मिनने गॅबरी आवडत असल्याचे जाहीर कबूल केले. यामुळे अफजलने तिच्याशी असलेले नाते संपवले.
जॅस्मिनने आपला विश्वासघात केल्याचा आरोप अफजलने केला. तसेच या घटनेचा त्याच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम झाल्याचे त्याने सांगितले.
अलीकडेच तिने त्रिशूरच्या गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात एक रील बनवले होते. यावेळी मंदिरातील तलावात तिने पाय धुतले. सदर रील व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका झाली. तसेच मंदिराच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचाही तिच्यावर आरोप ठेवण्यात आला.
वाद उफाळल्यानंतर जॅस्मिनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. आपल्याला मंदिराच्या नियमांची माहिती नव्हती, असा खुलासा जॅस्मिन जाफरने केला. या पोस्टमध्ये तिने म्हटले, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना आणि इतरांना मी केलेल्या व्हिडीओमुळे दुःख झाले. माझा कुणालाही दुखविण्याचा किंवा वाद निर्माण करण्याचा हेतू नव्हता. अज्ञानातून माझ्याकडून चूक झाली. त्याबद्दल मी मनापासून माफी मागते.