Keir Starmer Political Journey : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान स्टार्मर यांनी ब्रिटन भारतीय नागरिकांना व्हिसा नियमांमधून कोणतीही सूट देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भारतीय कामगारांसाठी अधिक व्हिसा खुले करणे हा त्यांच्या सध्याच्या योजनांचा भाग नसल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे स्टार्मर हे जुलै महिन्यात झालेल्या यूके-भारत मुक्त व्यापार कराराला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत आले आहेत.
दरम्यान, कीर स्टार्मर यांनी मुंबईत काही वेळापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या चर्चेनंतर मोदी यांनी सांगितलं की स्टार्मर यांच्या कार्यकाळात भारत व ब्रिटनचे संबंध अधिक दृढ झाले आहेत.
१५ महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणावर छाप
कीर स्टार्मर यांनी १५ महिन्यांपूर्वी (जुलै २०२४) ब्रिटनची सुत्र हाती घेतली. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय राजकारणात एका नव्या नेत्याची चर्चा होऊ लागली आहे. कीर स्टार्मर यांनी ब्रिटनसह आंतरराष्ट्रीय राजकारणावर अवघ्या काही महिन्यांमध्ये छाप पाडली आहे. परंतु, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.
स्टार्मर यांनी हुजूर पक्षाची १४ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली
ब्रिटनमध्ये प्रामुख्याने दोन पक्षांमध्ये संघर्ष आहे. त्यापैकी एक म्हणजे हुजूर पक्ष (कन्झर्व्हेटिव्ह पार्टी) तर, दुसरा मजूर पक्ष (लेबर पार्टी). ब्रिटनमध्ये हुजूर पक्ष २०१० पासून २०१४ पर्यंत सलग १४ वर्षे सत्तेत होता, हुजूर पक्षाची ही १४ वर्षांची सत्ता संपुष्टात आणणारे मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांना सक्रीय राजकारणात येऊन अवघी ११ वर्षे झाली आहेत. सुरुवातीला नवखा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं त्याच स्टार्मर यांनी ब्रिटनच्या निवडणुकीत हुजुर पक्षाला चारीमुंड्या चीत केलं. फारसं वक्तृत्व नसताना, राजकारणातील अनुभव नसताना त्यांनी हा चमत्कार घडवून आणला.
हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आले
२ सप्टेंबर १९६२ रोजी लंडनजवळच्या सरे येथील एका कामगार कुटुंबात कीर स्टार्मर यांचा जन्म जन्म झाला. त्यांचे वडील टूलमेकर तर आई एका रुग्णालयात परिचारिका होती. त्यांच्या कुटुंबात पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करणारे कीर हे पहिलेच होते. लीड्स आणि ऑक्सफर्डमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी वकिली केली. स्टार्मर हे फूटबॉलप्रेमी आहेत. ‘आर्सेनल प्रीमियर लिग क्लब’चे ते चाहते आहेत. तर, त्यांच्या पत्नी व्हिक्टोरिया या लंडनच्या ज्यू कुटुंबातील असून त्या आरोग्य क्षेत्रात काम करतात. स्टार्मर दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे.

पाच वर्षांत मजुर पक्षाचा कायापालट
वयाच्या पन्नाशीपर्यंत स्टार्मर हे वकिली करत होते. त्यानंतर २०१५ साली लंडनमधील मजूर पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या हॉलबॉर्न अँड सेंट पँकर्स मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक जिंकून ते हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून गेले. तर, २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी त्यांचं मताधिक्य दुपटीने वाढवलं आणि पुन्हा एकदा संसदेत गेले. त्यानंतर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाच्या पराभवानंतर या पक्षाची सुत्रे स्टार्मर यांच्या हाती आली आणि पुढची पाच वर्षे त्यांनी देशभर पक्षाची मोर्चेबांधणी केली.
विरोधी पक्षनेता म्हणून यशस्वी कारकिर्द
२०१९ ते २०२४ पर्यंत पाच वर्षांत ब्रिटनने तीन पंतप्रधान पाहिले. मात्र विरोधी पक्षनेतेपदी एकच व्यक्ती होती ती व्यक्ती म्हणजे कीर स्टार्मर .या काळात स्टार्मर यांनी तिन्ही पंतप्रधानांना कोंडीत पकडण्याचे अनेक प्रयत्न केले. आधी बोरीस जॉन्सन, लिझ ट्रस आणि शेवटी ऋषी सुनक यांचे कच्चे दुवे हेरून त्यावर स्टार्मर घाव घालत राहिले. एका बाजूला मजूर पक्षाची वाढती लोकप्रियता व हुजूर पक्षाला कंटाळलेल्या जनतेने २०२४ च्या निवडणुकीत स्टार्मर व लेबर पार्टीच्या बाजूने कौल दिला.