Assam Civil Services officer Nupur Bora: आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांच्या विशेष दक्षता विभागाने आसाम सिव्हिल सर्विसेसच्या २०१९ च्या बॅचच्या अधिकारी नुपूर बोरा यांच्या घरावर छापा टाकला असता त्यांच्या घरातून ९२ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने आढळून आले आहेत. तसेच त्यांच्या दुसऱ्या घरातून १० लाखांची अतिरिक्त रोकड आढळून आली आहे. एकूण सर्व मुद्देमाल दोन कोटींहून अधिकचा असल्याचे सांगितले जात आहे. नुपूर बोरा या हिंदूंच्या जमिनी मुस्लिमांना हस्तांतरित करत असल्याचा संशय असल्यामुळे गेल्या काही काळापासून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती, असे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी सांगितले.

सोमवारी मुख्यमंत्री दक्षता कक्षाने महिला अधिकारी नुपूर बोरा यांच्याशी संबंधित कथित चार ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. गुवाहाटी येथे असलेले त्यांचे निवासस्थान आणि बारपेटा येथील भाड्याच्या घऱ्याचा यात समावेश आहे.

नुपूर बोरा कोण आहेत?

नुपूर बोरा (३६) या मुळच्या आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील आहेत. २०१९ साली आसाम नागरी सेवेत निवड झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग कार्बी आंगलोंग जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त म्हणून करण्यात आली. जून २०२३ मध्ये त्यांची बदली होऊन बारपेटा जिल्ह्यात प्रांत अधिकारी म्हणून करण्यात आली. सध्या त्या कामरूप जिल्ह्यातील गोरोईमारी येथे प्रांत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

या कारवाईनंतर मुख्यंमत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, मुस्लीम बहुल बारपेटा जिल्ह्यात नियुक्ती मिळाली असताना नुपूर बोरा यांनी केलेल्या जमीन हस्तांतर प्रकरणांवर सरकारची नजर होती. मुस्लीम बहुल जिल्ह्यांत गेल्या काही काळापासून मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही या अधिकाऱ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. बारपेटा जिल्ह्यात नियुक्ती मिळाली असताना तिने (बोरा) पैशांच्या मोबदल्यात हिंदूंच्या जमिनी मुस्लिमांच्या नावे केल्या.