Young Indian Diplomat Who is Petel Gehlot: आंतरराष्ट्रीय मंचावर भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी आजवर अनेकदा पाकिस्तानच्या खोटारड्या वृत्तीला उघडे पाडलेले आहे. या यादीत आता पेटल गहलोत यांचेही नाव सामील झाले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताविरोधात गरळ ओकली होती. यानंतर भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी शनिवारी पाकिस्तानचा मुखवटा फाडला. त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि सिंधू जल कराराबाबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेले बिनबुडाचे दावे खोडून काढले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या नावाने गळा काढल्यानंतर स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी उत्तर देण्याचा अधिका वापरत जोरदार प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, “अध्यक्ष महोदय, आज सकाळी या सभेने पाकिस्तानी पंतप्रधानांची हास्यास्पद नाटके पाहिली. त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचा पुरस्कार केला, जो त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू आहे.”

“पाकिस्तानचे कोणत्याही प्रकारचे नाटक किंवा कोणतेही खोटे वास्तव लपवू शकणार नाहीत”, असेही पेटल गहलोत म्हणाल्या.

कोण आहेत पेटल गहलोत?

पेटल गहलोत यांचा जन्म दिल्लीतला. मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी राजशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वूमन मधून पदव्यूत्तर पदवी घेतली. २०१५ साली त्या भारतीय विदेश सेवेत (IFS) सामील झाल्या. पेटल या संयुक्त राष्ट्रात भारताच्या प्रमुख राजनैतिक अधिकारी म्हणून काम करत आहेत. जुलै २०२३ मध्ये संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनमध्ये त्यांची प्रथम सचिव म्हणून नियुक्ती झाली.

संयुक्त राष्ट्र संघटनेत जाण्यापूर्वी पेटल यांनी २०२० ते २०२३ पर्यंत परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोपियन पश्चिमी विभागात सहसचिव म्हणून काम केले. शी द पिपलच्या वृत्तानुसार, सहसचिव म्हणून काम करत असताना त्यांनी पॅरिस आणि सॅन फ्रान्सिस्को येथे भारतीय वाणिज्य दूतावासात काम केले.

गिटार डिप्लोमॅट म्हणून प्रसिद्ध

परराष्ट्र धोरणाबरोबरच संगीतातही पेटल गहलोत यांचा रस आहे. त्या उत्तम गिटार वादक आहेत. तसेच त्या गाणेही गातात. त्यामुळेच त्यांना गिटार डिप्लोमॅट असेही संबोधले जाते. त्यांनी मध्यंतरी इटलीचे प्रसिद्ध गीत बेला सियाओ हे गाणे गायले होते, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच बॉलिवूडचीही अनेक गाणी त्यांनी गायली आहेत.