Rohini Acharya : बिहार निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘यादवी’ माजल्याचं चित्र आहे. तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात फूट पडली आहे. लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीझ यांनीच आपल्याला कुटुंबातून बाहेर काढल्याचा आरोप केला आहे. दरम्यान रमीझ कोण आहे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आपण जाणून घेऊ रोहिणी आचार्य यांनी आरोप केलेला रमीझ खान कोण आहे.

रोहिणी आचार्य रमीझ बाबतचं वक्तव्य काय?

“माझं आता कुठलंही कुटुंब नाही. तुम्ही मला प्रश्न विचारु नका. तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीज यांना प्रश्न विचारा. माझं आता कुटुंब नाही. मला या तिघांनी कुटुंबातून हाकललं आहे. कारण या तिघांनाही जबाबदारी घ्यायची नाही. सगळं जग म्हणतं आहे जो चाणक्य असेल त्याला तुम्ही प्रश्न विचारणार का? कार्यकर्ता चाणक्याला प्रश्न विचारतो आहे. सगळा देश चाणक्याला प्रश्न विचारतो आहे की पक्षाची अशी अवस्था का झाली? संजय, तेजस्वी आणि रमीझ यांचं नाव घेतलं तर तु्म्हाला घरातून हाकललं जाईल, बदनाम केलं जाईल, तुम्हाला चपलेने मारलं जाईल.” अशी संतप्त प्रतिक्रिया रोहिणी आचार्य यांनी पाटणा विमानतळावर दिली.

रमीझ खान कोण आहे?

तेजस्वी यादव, संजय यादव यांच्या पाठोपाठ रमीझ खान हे नाव रोहिणी आचार्य यांनी घेतलं आहे. रमीझ खान हा तेजस्वी यादव यांचा बऱ्याच वर्षांपासूनचा मित्र आहे. तसंच तेजस्वी यादव यांच्या कोअर टीमचा तो भाग आहे. तेजस्वी यादव आणि रमीझ खान यांची ओळख पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानावर झाली होती. तेव्हापासून राजकारणाच्या मैदानापर्यंत येईपर्यंत दोघांची मैत्री अतिशय घट्ट झाली. रमीझ खानकडे राजदच्या सोशल मीडियाच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. रमीझ खान हा माजी खासदार रिझवान झहीर यांचा जावई आहे. रमी खानचे सासरे रिझवान झहीर हे समाजवादी पक्षाकडून दोनवेळा खासदार राहिले आहेत. तसंच त्यांना मायावतींच्या बसापकडून त्यांना तिकिट देण्यात आलं होतं. तसंच एकदा ते अपक्षही लढले होते. रमीझ खानचं नाव पहिल्यांदा तुलसीपूर हिंसाचार प्रकरणात २०२१ मध्ये समोर आलं होतं. आता याच रमीझ खानचं नाव रोहिणी आचार्य यांनी घेतलं आहे. ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.