राजस्थानमध्ये राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तीन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सुखदेव सिंह गोगामेडी यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर राजस्थानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ठिकठिकाणी राजपूत समाजाचे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अशातच रोहित गोदारा गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रोहित गोदारा गँगने गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली. तर, रोहित गोदारा कोण आहे? याबद्दल जाणून घेणार आहोत.

“सुखदेव गोगामेडी आमच्या दुश्मनांची मदत करत असे”

रोहित गोदारानं फेसबुक पोस्टवर लिहिलं की, “राम राम… मी रोहित गोदारा कपूरसरी.. गोल्डी ब्रारच्या भावांनो… आज जी सुखदेव गोगामेडीची हत्या झाली आहे, त्याची जबाबदारी आम्ही घेतो. ही हत्या आम्ही केली आहे. सुखदेव गोगामेडी आमच्या दुश्मनांची मदत करत असे. दुश्मनांना पूर्णपणे मजबूत करण्याचं काम गोगामेडी करत होता. आता आमच्या दुश्मनांनी आपल्या घराच्या चौकटीवर आपली पार्थिव तयार ठेवावी.”

२०१० साली गोदारने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं

रोहित गोदारा राजस्थानच्या बिकानेरमधील लूणकरण येथील रहिवाशी आहे. गोदारा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आहे. त्याच्यावर ३२ हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. २०१० साली गोदारने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं होतं. त्याने राजस्थानच्या व्यावसायिकांकडून ५ ते १७ करोडपर्यंत खंडणीही मागितल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा : कोण होते सुखदेव सिंह गोगामेडी? ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध केल्यामुळे चर्चेत आले होते राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष

मागील वर्षी गँगस्टर राजू ठेहटचा खून केला होता

रोहित गोदारावर राजस्थानचा गँगस्टर राजू ठेहटच्या खूनाचा आरोप आहे. फेसबुक पोस्ट करत रोहित गोदाराने राजू ठेहटच्या खूनाची जबाबदारी घेतली होती. “आनंदपाल सिंह आणि बलवीर बानूडा यांच्या हत्येचा बदला घेतला,” असं रोहित गोदारानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.

हेही वाचा : राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांवरील गोळीबाराचा CCTV व्हिडीओ समोर, शेजारीच बसलेले हल्लेखोर; अन् अचानक…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस केलं जारी

रोहित लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारसाठी काम करतो. सिद्धू मुसेवाला हत्याकांडमध्ये रोहित गोदाराचं नाव आलं होतं. १३ जून २०२२ साली दिल्लीतून नकली पासपोर्टच्या आधारे गोदारा दुबईला पळून गेला होता. नकली पासपोर्टवर गोदारानं आपलं नाव पवन कुमार लिहिलं होतं. त्याच्याविरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केलं आहे. सध्या रोहित कॅनडात असल्याचं सांगितलं जात आहे.