अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबोट ही दोन नावं सध्या चांगलीच चर्चेत आहेत. विवाहबाह्य संबंध अशाप्रकारे उघड होणं हा कदाचित या दोघांसाठीच मोठा धक्का होता. बॉस्टनमधील कोल्डप्ले कॉन्सर्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर एका कारणामुळे होत आहे. ते म्हणजे या कॉन्सर्टमधला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अॅस्ट्रोनॉमर या प्रसिद्ध कंपनीचे सीईओ त्यांच्या एचआर हेडसोबत कॉन्सर्टची मजा घेताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकांसोबत नाचताना दिसत आहेत. मात्र अचानक जेव्हा कॅमेरा त्यांच्याकडे वळतो आणि ते तोंड लपवतात असा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
कोण आहेत अँडी बायरन?
अँडी बायरन हे अॅस्ट्रोनॉमर या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. ही एक डेटा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. ही कंपनी व्यवसायांना त्यांचा डेटा व्यवस्थापित करण्यास मदत करते. बायरन जुलै २०२३पासून कंपनीचे नेतृत्व करत आहेत आणि कंपनीच्या यशस्वी वाटचालीत त्यांची मोठी भूमिका आहे.
बायरन यांच्या लिंक्ड इन प्रोफाइलनुसार, त्यांनी सीईओ होण्यापूर्वी लेसवर्क, सायबेरीसन, फ्यूझ, बीएमसी सॉफ्टवेअर, ब्लेडलॉजिक आणि व्हिरी सेंटर याकंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे. ते सायबरीसनमध्ये मुख्य महसूल अधिकारी होते. बायरन यांची पत्नी मेगन केरिगन बायरन या बॅनक्रॉफ्ट स्कूलमध्ये असोसिएट डायरेक्टर आहे. ते त्यांच्या दोन मुलांसह न्यूयॉर्क इथे राहतात.
कोण आहे क्रिस्टिन कॅबोट?
अमेरिकेतली बॉस्टन इथे जन्मलेल्या क्रिस्टिन यांनी गेटिसबर्ग कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी घेतली आहे. नोव्हेंबर २०२४मध्ये ती अॅस्ट्रोनॉमर या कंपनीसह काम करू लागली. २००० मध्ये तिने द स्क्रीन हाऊसमध्ये प्रोजेक्ट मॅनेदर म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरूवात केली.
कॅबोट स्वत:ला एक उत्साही कार्यकर्ता म्हणून वर्णन करते. कॅबोटचे केनेथ सी थॉर्नबीशी लग्न झाले होते. तिने २०१८मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता आणि २०२२ मध्ये अधिकृतपणे ते वेगळे झाले.
बॉस्टनमधील कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये बायरन आणि क्रिस्टिन दोघेही कॅमेऱ्यात कैद झाले आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच काहींनी या दोघांच्या वर्तनावरही प्रश्न निर्माण केले आहेत.