Osho आचार्य रजनीश किंवा ओशो असं ज्यांची ओळख आहे त्यांच्या विचारांचं आणि त्यांच्या प्रवचनांचं गारुड आजच्या पिढीवरही पाहण्यास मिळतं. ओशो ( Osho ) आणि गूढ हे एक समीकरणच होऊन बसलं आहे. ११ डिसेंबर हा ओशोंचा जन्मदिवस. आज ओशो असते तर त्यांचं वय ९३ असतं म्हणजे १९९० मध्ये त्यांचं निधन झालं. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. असामान्य प्रतिभा लाभलेला आणि दीर्घकाळ चर्चेत राहिलेला स्वयंघोषित संत अशी त्यांची ख्याती होती. गौतम बुद्ध, गीता, कृष्ण या विषयांवरची त्यांची प्रवचनं लोक आजही ऐकतात, वाचतात.

११ डिसेंबर हा जन्मदिवस

११ डिसेंबर १९३१ हा ओशोंचा जन्मदिवस. मध्यप्रदेशातल्या कुचवाडा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांचं नाव चंद्रमोहन जैन असं होतं. तत्त्वज्ञान हा सुरुवातीपासूनच आवडता विषय होता. त्यांनी जबलपूरच्या विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच विद्यापीठात ते प्राध्यापकही होते. तसंच त्यांनी देशातल्या विविध विचारधारांवर प्रवचनं देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांना आचार्य रजनीश असं म्हटलं जात होतं. त्यांनी जेव्हा नवसंन्यास आंदोलन सुरु केलं तेव्हा त्यांनी स्वतःला ओशो ( Osho ) म्हणण्यास सुरुवात केली.

१९८१ ते १९८५ या कालावधीत ओरेगॉनमध्ये वास्तव्य

१९८१ ते १९८५ या कालावधीत ओशो ( Osho ) अमेरिकेतल्या ओरेगॉन या ठिकाणी गेले. तिथे ६५ एकर जमिनीवर त्यांचा आश्रम उभा राहिला. त्यांच्या शिष्यांमध्ये आणि अनुयायांमध्ये विदेशी भक्तही होते. त्यामुळे त्यांना पैशांची कमतरता कधीही भासली नाही. ओरेगॉन या ठिकाणी जो आश्रम उभारण्यात आला होता त्याचं नाव रजनीशपुरम असं होतं. या शहराचं नाव रजनीशपुरम असंच व्हावं यासाठी त्यांनी नोंदणीही करण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांनी त्याला विरोध दर्शवला. १९८५ मध्ये ओशो पुन्हा भारतात आले. ओशो ( Osho ) या चार वर्षांच्या कालावधीत अत्यंत वादग्रस्त संत ठरले होते. रोल्स रॉईस कार्स, त्यांचे डिझायनर कपडे हा सगळा जगाच्या चर्चेचा विषय ठरला होता.

ओशोंचा १९९० मध्ये मृत्यू

१९८५ मध्ये भारतात परतल्यानंतर ओशोंनी ( Osho ) पुण्यातल्या कोरेगाव पार्क या ठिकाणी असलेल्या त्यांच्या आश्रमात वास्तव्य केलं. १९ जानेवारी १९९० या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. ओशो यांच्या जवळच्या अनुयांनी त्यांचा आश्रम चालवण्यास सुरुवात केली. या आश्रमाची संपत्ती कोट्यवधी रुपयांची आहे. या आश्रमाच्या मालमत्तेवरुन ओशोंच्या शिष्यांमध्येही वाद आहे. ओशो ( Osho ) यांचे शिष्य योगेश ठक्कर यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत हे सांगितलं होतं की ओशो यांची मालमत्ता पाहण्यासाठी सगळ्यांना उपलब्ध झाली पाहिजे यासाठी त्यांनी जे मृत्यूपत्र लिहिलं आहे त्याला आम्ही बॉम्बे हायकोर्टात आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे डॉक्टर गोकुळ गोकाणी यांचं म्हणणं आहे की ओशो ( Osho ) यांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर काही प्रश्न निर्माण झाले होते ज्याची उत्तरं आजही मिळालेली नाहीत.

हे पण वाचा ओशोंनी रामायणाचं उदाहरण देत सांगितलेली बिरबलाची ‘ही’ गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का?

ओशोंच्या मृत्यूच्या दिवशी काय घडलं होतं?

ओशो यांच्या मृत्यूबाबत अभय वैद्य यांनी हू किल्ड ओशो ( Osho ) नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात ते म्हणतात १९ जानेवारी १९९० ला मी डॉक्टर गोकुळ गोकाणींना फोन केला आणि सांगितलं तुमचं लेटरहेड आणि इमर्जन्सी कीट घेऊन या. गोकुळ गोकाणी जेव्हा आले तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. त्यावेळी ओशोंच्या काही शिष्यांनी सांगितलं की ओशोंचा मृत्यू जवळ आला आहे तुम्ही त्यांना वाचवा. मात्र गोकुळ गोकाणींनीही हे पण म्हटलं आहे की दुपारी दोन वाजता येऊनही मला ओशोंच्या जवळ जाऊ दिलं गेलं नाही. मी आश्रमात वाट पाहिली त्यानंतर काही तासांनी मला हे सांगण्यात आलं की ओशोंचं मृत्यूपत्र लिहून द्या. त्यांचा मृत्यू झाला आहे.

ओशोंच्या शिष्या नीलम यांनी काय सांगितलं होतं?

ओशो ( Osho ) यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या आईलाही उशिरा देण्यात आली असं ओशो यांच्या शिष्या नीलम यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांच्या आईने दीर्घकाळ हा आरोप केला होता की माझ्या मुलाला (ओशो) तुम्ही मारलंत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओशोंभोवतीची रहस्यं आजही कायम

योगेश ठक्कर यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार ओशो आश्रमाची संपत्ती हजारो कोटींची आहे. तसंच त्यांना या मालमत्तेतून आणि पुस्तकांमधून १०० कोटींचं मानधन मिळतं. ओशो इंटरनॅशनने हा दावा केला आहे की त्यांना वारसा हक्काने ओशोंची ( Osho ) मालमत्ता मिळाली आहे. कारण ओशोंच्या मृत्यूपत्रातच तसा उल्लेख आहे. तर योगेश ठक्कर यांचं म्हणणं आहे की जे मृत्यूपत्र ओशो इंटरनॅशनलने सादर केलं आहे ते बनावट आहे. मात्र ओशो इंटरनॅशनलच्या सदस्या आणि ओशोंच्या शिष्या अमृत साधना यांनी हे आरोप फेटाळले आहेत. एकंदरीत या सगळ्या गोष्टी विचारांत घेतल्या तर लक्षात येतं की ओशो ( Osho ) आणि त्यांच्या आयुष्याभोवती अनेक रहस्यं फिरत होती. तसंच मृत्यूनंतर त्यांच्याविषयीची अनेक रहस्यं कायम आहेत.