लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने इंडिया आघाडीनेही आपल्या बैठकांना जोर दिला आहे. जागावाटप, इंडिया आघाडीचा चेहरा, समन्वयक आदी मुद्दे प्रलंबित असल्याने आज दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही दिल्लीला गेले आहेत. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीचा चेहरा आता ठरवावा लागेल, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. त्यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, ऑगस्टनंतर इंडिया आघाडीची एकत्रित बैठक झाली नाही. पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील अनेक प्रादेशिक पक्ष सामील होते. त्यामुळे या कालावधीनंतर इंडियाची बैठक होत आहे. तीन राज्यातील निवडणुकांच्या निकालावर चर्चा होणं आवश्यक आहे. ती चर्चा या बैठकीत होईल. जानेवारीपासून निवडणुकीचं वर्ष सुरू होईल. एप्रिल आणि मे महिन्यात वेळापत्रकानुसार निवडणुका होतील. त्यानुसार तयारीला लागावं लागेल. बाकीच्यांच्या सूचना येतायत त्यावर आमची मते आम्ही मांडू. बैठकीनंतर या विषयावर बोलणं अधिक योग्य राहील.
हेही वाचा >> “हजार आचारी व रस्सा भिकारी या भूमिकेतून…”, ठाकरे गटाची इंडिया आघाडीच्या स्थितीवर टिप्पणी; काँग्रेसला केलं आवाहन!
दरम्यान, इंडिया आघाडीची स्थापना झाल्यापासून या आघाडीचा चेहरा समोर आलेला नाही. बैठकीच्या निमित्ताने त्या त्या राज्यातील नेत्यावर बैठकीची जबाबदारी देण्यात आली. परंतु, या आघाडीचा समन्वय किंवा चेहरा समोर आलेला नाही. तसंच, इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवारही जाहीर करण्यात आलेला नाही. यावरून एनडीएने अनेकदा टीकाही केली. एनडीएकडून पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचा चेहरा समोर आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतून ही संधी कोणाला दिली जाईल, यावर चर्चा होणे बाकी आहे. याबाबत ठाकरे म्हणाले, “मोदींच्या समोर चेहरा हा विषय असला तरीही या आघाडीला समन्वयक, निमंत्रक आणि शक्य असेल तर एखादा चेहरा ठरवता येतो का याचा विचार कारावा लागेल.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या चेहऱ्यासाठी नितीश कुमारांचे पाटण्यात पोस्टर लागले आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता ठाकरे म्हणाले, आम्ही एकत्र आलो आहोत. कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा भरलेली नाही. आम्हाला देश वाचवायचा आहे. ज्या पद्धतीने खासदारांचं निलंबन झालं. महाराष्ट्रातील विधिमंडळातील चित्र पाहिलंत, हे बघितल्यानंतर देशातील लोकशाही शेवटच्या घटका मोजतेय का हा प्रश्न आहे. कोणाच्याही डोक्यात नेतृत्त्वाची हवा नाहीय. देशातील लोकशाही जगली तर देश जगेल. ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो आहोत.
अरविंद केजरीवाल नाराज?
इंडिया आघाडीचे घटकपक्ष असलेले आपचे नेते अरविंद केजरीवाल नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आजच्या बैठकीत ते गैरहजर राहणार असल्याच्याही चर्चा आहेत. यावरून उद्धव ठाकरे म्हणाले, केजरीवाल नाराज नाहीत. माझी त्यांच्यासोबत बैठक झाली असून हसतं-खेळतं वातावरण होतं. बैठकीनिमित्ताने काही गोष्टी बोललो.
“घोडामैदान जवळ आलेलं आहे. रणांगणावर सगळे सैन्य एकत्र जमलं आहे. पण, एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा नसला तरीही समन्वयकाचा चेहरा निवडला जाईल. तोच पंतप्रधान पदाचा चेहरा असेल असं नाही. कोणीतरी एक निमंत्रक लागेल. नाहीतर सगळेजण आपआपल्या राज्यात व्यस्त असतात. त्या सर्वांना एकत्रित आणण्यासाठी एक व्यक्ती लागेल”, असं ठाकरे म्हणाले.