रेल्वेसारख्या घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रतिलिटर एक रुपया वाढ करण्यात आली असून सबसिडीच्या दरातील गॅस सिलिंडरपेक्षा अधिक गॅस घेणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रतिसिलिंडर ३७.५० रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
तथापि, पेट्रोल पंपांवरून विक्री करण्यात येणाऱ्या डिझेलच्या किरकोळ विक्रीदरात अथवा सबसिडीच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता रेल्वे, संरक्षण, राज्य मार्ग परिवहन महामंडळ अशा घाऊक ग्राहकांना दिल्लीतील पेट्रोल पंपावर ५८.५८ रुपये प्रतिलिटर दराने डिझेलची विक्री करण्यात येणार आहे.
तेल कंपन्यांनी शुक्रवारी घाऊक ग्राहकांसाठी प्रतिलिटर ९४ पैसे डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये विक्रीकर अथवा व्हॅटचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांसाठी ही दरवाढ प्रत्यक्षात सव्वा रुपये इतकी आहे.
त्याचप्रमाणे तेल कंपन्यांनी सबसिडीच्या सिलिंडरव्यतिरिक्त अधिकच्या सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. शुक्रवारीच तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात १.४० रुपये प्रतिलिटर अशी वाढ केली होती.