भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात निर्विवाद वर्चस्व मिळवले. हे मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण राहील याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले. कधी राजनाथ सिंह हे मुख्यमंत्री होतील असे म्हटले जाऊ लागले तर कधी केशव प्रसाद मौर्य हे मुख्यमंत्री होतील याबदद्लची चर्चा होऊ लागली होती. निवडणुकीआधी काही काळ चर्चा होती योगी आदित्यनाथ यांची परंतु निवडणुकीदरम्यान अथवा नंतर कुणीही त्यांचे नाव घेतले नाही.
काल अचानकपणे विधिमंडळाचा नेता म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि सर्व जण आश्चर्यचकित झाले. भाजपने आधी आपला चेहरा हा विकासाभिमुख आहे असे दाखवले, परंतु तो मुखवटा होता आणि त्याखाली हिंदुत्वाचा चेहरा लपलेला होता अशी ओरडही विरोधकांनी केली. योगी आदित्यनाथ यांची निवड का करण्यात आली हे एक गुपितच आहे. त्यांची निवड कोणत्या आधारावर करण्यात आली असू शकते याबाबतचे विश्लेषण फायनांशिएल एक्सप्रेसने केले आहे.
योगी आदित्यनाथ हा हिंदुत्वाचा चेहरा आहे याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांच्यावर केंद्रातील नेत्यांची कृपादृष्टी असून विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते लाडके नेते आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये राजकारणावर संत-महंत यांचा मोठा प्रभाव आहे. या संतांची राजकारण उठबस असते. त्यामुळे एका मठाधीशच मुख्यमंत्री झाल्यास हा वर्ग एक खुश होईल असा विचार करुन त्यांना हे पद देण्यात आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणावर जात आणि धर्माचा प्रभाव आहे.
मुलायम यांचा यादव आणि मुस्लिम फॉर्मुला असो वा मायावतींची सामाजिक अभियांत्रिकी असो दोन तीन समाजाची मोट बांधून निवडणुकांना सामोरे जाण्याची उत्तर प्रदेशात प्रथा आहे. त्या-त्या समाजाचे संतुष्टीकरण होणे हे देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानले जाते. योगी आदित्यनाथ हे ठाकूर समाजाचे आहे तसेच मठाधीश आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्यामुळे ठाकूर आणि ब्राह्मण वर्गाला आपलाच प्रतिनिधी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहे असे वाटेल अशी देखील शक्यता आहे.
केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांना उप-मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. राज्यात प्रथमच दोन उप-मुख्यमंत्री बनवण्यात आले आहेत. एखाद्या कॉर्पोरेट कंपनी प्रमाणे दोन समतुल्य व्यक्तींना एकच पद देऊन संतुलन राखण्याचा प्रकार भाजपने केला आहे. आदित्यनाथ, मौर्य आणि शर्मा यांच्या निवडीमुळे प्रशासकीय कारभारात एक संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बसप आणि मायावती यांच्या काळात कायदा आणि न्यायव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या वेळेपासूनच प्रशासकीय यंत्रणेवर राजकीय प्रभाव असल्याचे दिसून येते. या व्यवस्थेवर वचक निर्माण करायची असेल तर कडक शिस्तीचा नेता हवा. त्यामुळेच आपले गुरू अवैद्यनाथ यांच्या कडक शिस्तीत वाढलेला आणि प्रशासनावर आपला दरारा निर्माण करू शकणारा नेता आदित्यनाथ यांच्या शिवाय कोण असेल असा विचार भारतीय जनता पक्षाने केला असावा या कारणांमुळे आदित्यनाथ यांची निवड करण्यात आली असावी असे फायनांशिएल एक्सप्रेसने म्हटले आहे.