भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिरातला एक फोटो समोर आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे तिघेही दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गाभाऱ्याच्या बाहेर उभं करण्यात आलं आणि अश्विनी वैष्णव तसंच धर्मेंद्र प्रधान यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन देण्यात आलं. या प्रकरणी आता योगेंद्र यादव यांनी चौकशीची मागणी केली आहे. तसंच हे खरं असेल तर हा संपूर्ण देशाचा अपमान आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. काय म्हटलं आहे योगेंद्र यादव यांनी? दिलीप मंडल यांचं ट्वीट रिट्विट करत योगेंद्र यादव यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचं सत्य समोर आलं पाहिजे. राष्ट्रपतींसह जातीभेद झाला असेल तर संपूर्ण देशाचा अपमान आणि गंभीर अपराध आहे असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. पत्रकार दिलीप मंडल यांनी ट्वीट केला व्हिडीओ आणि फोटो पत्रकार दिलीप मंडल यांनी याविषयीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी ANI चा व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे की आम्ही हे पाहिलं आहे की अश्विनी वैष्णव आणि धर्मेंद्र प्रधान यांनी जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा केली. मग भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गाभाऱ्याच्या बाहेर लावण्यात आलेल्या बॅरियरच्या बाहेर का उभं केलं गेलं आहे? त्यांना गाभाऱ्यात प्रवेश का दिला गेलेला नाही? धर्मेंद्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिरातील मूर्तींना गाभाऱ्यात जाऊन स्पर्श केला आणि दर्शन घेतलं. त्याच मंदिरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मात्र बाहेरुन पूजा केली. ही बाब चिंताजनक आहे, या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे तसंच पुजाऱ्यांना अटक केली गेली पाहिजे अशीही मागणी दिलीप मंडल यांनी केली आहे. दिलीप मंडल यांचं हेच ट्वीट योगेंद्र यादव यांनी ट्वीट करत राष्ट्रपतींना बाहेर का उभं केलं गेलं? असा प्रश्न विचारला आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. २० जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, धर्मेंद्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिराला भेट दिली. त्याचवेळी हा प्रकार घडल्याचा आरोप होतो आहे.