Ind Vs Pak: भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषक २०२५ च्या जेतेपदावर नाव कोरलं. आशिया चषकाच्या या सामन्यात या दोन्ही संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने बाजी मारली. पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यामागचं कारण म्हणजे ही ट्रॉफी मोहसीन नक्वी यांच्या हस्ते देण्यात येणार होती. मोहसीन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत, तसेच ते पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष आणि पकिस्तानचे मंत्री देखील आहेत.

या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता भारतीय संघाचं कौतुक करण्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने आशिया चषक जिंकल्यानंतर काँग्रेसने टीम इंडियाचं अभिनंदन न केल्याचा आरोप करत भाजपाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत त्यांनी टीम इंडियाला अद्याप शुभेच्छा का दिल्या नाहीत? असा सवाल भाजपाने केला. तसेच काँग्रेस पाकिस्तानची बी टीम असल्याचा आरोप करत राहुल गांधी हे असीम मुनीर यांचे चांगले मित्र असल्याचंही भंडारी यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

प्रदीप भंडारी यांनी काय म्हटलं?

“भारताने पाकिस्तानला हरवल्याबद्दल राहुल गांधींनी भारतीय क्रिकेट संघाचं अद्याप अभिनंदन केलं नाही. काँग्रेस नेहमीच भारतापेक्षा पाकिस्तानला का पाठिंबा देते?”, असं प्रदीप भंडारी यांनी म्हटलं. “तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये काँग्रेस पाकिस्तानबरोबर उभी होती. ‘ऑपरेशन तिलक’मध्ये काँग्रेस पाकिस्तानबरोबर उभी होती. राहुल गांधी हे असीम मुनीर यांचे सर्वात चांगले मित्र आहेत”, अशा खोचक शब्दांत प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसवर घणाघात केला.

दरम्यान, भाजपाचे नेते अमित मालवीय म्हणाले की, “टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या पक्ष निशब्द झाला असेल. ऑपरेशन सिंदूरनंतर जेव्हा ते भारतीय लष्कराच्या हल्ल्यांसाठी त्यांचं अभिनंदन करण्यास तयार झाले नाहीत, तेव्हा आता ते भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सामील होण्यापूर्वी मोहसीन नक्वी आणि पाकिस्तानमधील त्यांच्या इतर व्यवस्थापकांकडून परवानगीची वाट पाहत असतील. आता आशिया कप जिंकल्यानंतर काँग्रेसकडून आपल्या राष्ट्रीय संघाचं अभिनंदन करणारी एकही सोशल मीडियावर पोस्ट का नाही?”, असंही मालवीय यांनी म्हटलं आहे.