BJP slams Rahul Gandhi: अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात आयोजित वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेयर्स या परिसंवादात लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाग घेतला होता. यावेळी त्यांनी प्रभू राम यांना पौराणिक व्यक्तीमत्व म्हटल्यानंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपाने या विधानावर जोरदार टीका केली असून राहुल गांधी यांचे विधान हिंदूविरोधी मानसिकतेचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. तसेच काहींनी राहुल गांधींना राम विरोधी असेही म्हटले आहे. राहुल गांधी यांचा विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हिंदू राष्ट्रवादाचे वर्चस्व वाढत जात असताना या काळात सर्व समुदायांना सामावून घेणारे धर्मनिरपेक्ष राजकारण कसे करणार? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात राहुल गांधी यांनी वरील विधान केले.
राहुल गांधी म्हणाले की, भारतातील महान समाज सुधारक आणि राजकीय विचारवंत धर्मांध नव्हते. तसेच भाजपाच्या विचारांना मी हिंदू मानत नाही.
राहुल गांधी म्हणाले, “आपल्या सर्व पौराणिक पात्रांपैकी प्रभू राम सर्वात दयाळू होते. ते क्षमाशील होते. भाजपाचा हिंदुत्वाबद्दलचा विचार मला मान्य नाही. माझ्या मते, हिंदू विचार अधिक खुला, प्रेमळ, सहिष्णु आणि सर्वांना जवळ करणारा आहे. प्रत्येक राज्यात आणि समाजात असे लोक होऊन गेले, ज्यांनी या विचारांसाठी आयुष्य खर्ची केले आणि बलिदानही दिले. गांधींजी हे त्यापैकीच एक. माझ्यामते, भीतीमधून लोकांविरुद्ध द्वेष आणि राग निर्माण होतो. तुम्ही जर घाबरत नसाल तर तुम्ही कुणाचाही द्वेष करणार नाहीत.”
“भाजपाची संकल्पना हा हिंदू विचार आहे, असे मी मानत नाही. विचासरणीच्या बाबतीत ते अतिशय क्षुल्लक आहेत. आता त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळे या सत्तेतून त्यांना अमर्याद अशी संपत्ती आणि शक्ती प्राप्त झाली आहे. परंतु ते बहुसंख्य भारतीय विचारवंतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत”, असेही राहुल गांधी या परिसंवादात म्हणाले.
भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींच्या विधानावर टीका केली आहे. एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “हिंदू आणि प्रभू राम यांचा अवमान करणे ही आता काँग्रेस पक्षाची ओळख बनली आहे. त्यांनी शपथपत्राद्वारे प्रभू रामाचे अस्तित्व नाकारले, राम मंदिराला विरोध दर्शविला. हिंदू दहशतवाद ही संज्ञा वापरली, आता राहुल गांधी प्रभू रामास पौराणिक पात्र असल्याचे म्हणत आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासही हजेरी लावली नव्हती. यावरूनच त्यांची राम द्रोही आणि हिंदू विरोधी मानसिकता दिसून येते. ते पाकिस्तानची भाषा बोलत असतून भारतातील जनता त्यांना माफ करणार नाही.”