Video Of Putin And Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी अलास्का येथे रशिया-युक्रेन युद्धावर सुमारे अडीच तास चर्चा केली. पण, ही बैठक सुरू होण्यापूर्वीच पुतिन यांना एका विचित्र पत्रकार परिषदेचा सामना करावा लागला. युक्रेन संघर्षावर ट्रम्प यांच्याशी चर्चेसाठी पोहोचल्यावर पत्रकारांनी रशियन राष्ट्राध्यक्षांवर प्रश्नांचा भडिमार केला. पत्रकारांनी त्यांना युद्धबंदी आणि जीवितहानीबद्दल प्रश्न विचारले.
“तुम्ही नागरिकांच्या हत्या कधी थांबवणार?” असे एका पत्रकाराने विचारले, ज्यावर पुतिन यांनी ऐकू येत नाही असे संकेत देणारे हावभाव केले. यावर दुसऱ्या पत्रकाराने त्यांना विचारले, “ट्रम्प यांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा?”
दोन्ही नेत्यांनी अधिकृतपणे कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, तरीही ट्रम्प यांनी खोलीत थोड्या वेळासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना “धन्यवाद” म्हटले.
ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पुतिन यांनी ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या “समंजसपणा” बद्दल सांगितले. ज्यामुळे युक्रेनमध्ये शांतता येऊ शकते असे त्यांनी सांगितले,परंतु त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. “आम्हाला आशा आहे की, आमच्या सामंजस्यामुळे युक्रेनमध्ये शांततेचा मार्ग मोकळा होईल”, असे ते म्हणाले.
रशियाला इशारा
दरम्यान, ट्रम्प म्हणाले की पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेतून मोठी प्रगती झाली आहे, ते युरोपियन नेते आणि युक्रेनच्या झेलेन्स्की यांच्याशी बोलतील. ट्रम्प यांनी यापूर्वी या शिखर परिषदेला “खरोखर एक आनंददायी बैठक” असे संबोधले होते. परंतु जर पुतिन युद्ध संपवण्यास सहमत झाले नाहीत तर त्यांनी रशियाला “खूप गंभीर परिणाम” भोगावे लागतील असा इशाराही दिला आहे.
आता जबाबदारी झेलेन्स्की यांच्यावर
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी “अत्यंत फलदायी” बैठकीनंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, अलास्का शिखर परिषदेला पुढे नेण्याची आणि रशियाच्या तीन वर्षांच्या आक्रमणाचा अंत करण्यासाठी करार निश्चित करण्याची जबाबदारी आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर आहे.
“आता हा करार पूर्ण करणे खरोखर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर अवलंबून आहे. आणि मी युरोपीय देशांनाही सांगेन की, त्यांना यामध्ये थोडेसे सहभागी व्हावे लागेल, परंतु ते राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर अवलंबून आहे”, असे ट्रम्प यांनी शिखर परिषदेनंतर फॉक्स न्यूजला सांगितले.