भारतातील प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देशातील सध्याच्या स्थितीवरुन काही तिखट प्रश्न विचारले आहेत. देशात सध्या भीतीचे वातावरण बनले असून लोक सरकारवर टीका करण्यासही घाबरत आहेत. लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा का नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. एका चर्चात्मक कार्यक्रमामध्ये बजाज यांनी आपली भुमिका मांडली. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बजाज म्हणाले, “सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा लोकांना का नाही? लोकांना युपीएच्या सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र, सध्याच्या सरकारने भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे. युपीए-२च्या कार्यकाळात आम्ही कोणावरही टीका करु शकत होतो.”

बजाज यांच्या या प्रश्नांना उत्तर देताना अमित शाह म्हणाले, “देशात कुठल्याही प्रकारच्या भीतीचे वातावरण नाही. कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. मोदी सरकारवर माध्यमांमधून कायमच टीका होत राहिली आहे. तरीही तुम्ही म्हणत असाल की देशात असे वातावरण आहे तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला काम करावे लागेल. सरकार पारदर्शी पद्धतीने काम करीत आहे. कोणती टीका होत असेल तर त्याला गांभीर्याने घेत आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करीत असतो.”

दरम्यान, काश्मीरच्या स्थितीवर प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शाह म्हणाले, उद्योग जगताने आपल्या कुटुंबासह काश्मीर फिरुन यावे आणि तिथल्या खऱ्या वातावरणाची स्वतः पाहणी करावी. देशाचा गृहमंत्री म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही काश्मीरला भेट द्यावी.

यावेळी शाह यांनी खासदार स्वाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या विधानाचा भाजपा निषेध करतो असे म्हटले. राजनाथ सिंह यांनी यापूर्वीच साध्वींच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. त्याचबरोबर भाजपा आपल्या खासदारावर कारवाई करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the public is not allowed to question the government rahul bajaj questions amit shah aau
First published on: 01-12-2019 at 09:55 IST