नागपूर: लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपावरून निर्माण झालेला पेच व उमेदवार निवडीवरून नाराज भाजप नेत्यांना शांत करण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानाहून करीत असल्याने नागपूर हे महायुतीसाठी ‘समजूत’ केंद्र ठरले आहे.
महायुती संघटितपणे निवडणुकीला सामोरे जाऊन महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकणार असे आत्मविश्वासपूर्वक सांगणाऱ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये अद्याप जागा वाटपावरून एकमत होऊ शकले नाही. तसेच माढा येथे भाजपने दिलेल्या उमेदवारावर प्रचंड नाराजी आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी, ठाणे, नाशिकच्या जागेचा वाद कायम आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने फडणवीस यांनी त्यांचा मुक्काम नागपूरमध्ये आहे. त्यामुळे रोज त्यांना विविध भागातील भाजप व मित्रपक्षातील नेते येऊन भेट घेत असून गरज पडली तर कधी फडणवीस हे स्वत: काही नेत्यांना बोलवून घेत त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. मागील दोन आठवड्यात त्यांना १५ नेते भेटून गेले. त्याची सुरूवात शिंदे सेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या भेटीने झाली. त्यानंतर माढा मतदारसंघातील उत्तम जानकर, रणजीत निंबाळकर , शहाजी पाटील, जयकुमार गोरे, कोकणातील किरण सामंत, उदय सामंत, दीपक केसरकर, मराठवाड्यातील भागवत कराड, प्रशांत बंब, बारामती मतदारसंघातील राहुल कुल, अमरावतीचे राणा दाम्पत्य, पुण्याचे काँग्रेस नेते आबा बागुल- काँग्रेस आदी नेत्यांचा समावेश आहे. हे सर्व नेते एक तर उमेदारीसाठी इच्छुक होते किंवा महायुतीने दिलेल्या उमेदवारावर नाराज होते.
आणखी वाचा-काँग्रेससारखे डावे पक्ष अल्पसंख्याकांचे संरक्षण करू शकत नाहीत, केरळच्या IUML प्रमुखांना विश्वास
यवतमाळ-वाशीमच्या शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला होता. त्यामुळे गवळी यांनी नागपूरमध्ये येऊन फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या भेटीनतरही गवळी यांना उमेदवारी मिळू शकली नाही, मात्र त्यांच्यातील बंडोबा शांत झाला.
माढा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निबाळकर यांना भाजपमधूनच प्रचंड विरोध आहे. त्यांची उमेदवारी बदलावी, अशी मागणी त्या भागातील नेत्यांनी केली होती. मोहिते पाटील कुटुंबानीतर बंडच केले. नाराजी अजून वाढू नये म्हणून फडणवीस यांनी या मतदारसंघातील नाराज उत्तम जानकर, व उमेदवार रणजीत निंबाळकर , यांना विशेष विमान पाठवून बोलवून घेतले होते. फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली, असे या भेटीनंतर उत्तम जानकर यांनी माध्यमांना सांगितले.
शिंदे गटातील रत्नागिरी-सिंधूदुर्ग या जागेवर भाजपने दावा केला आहे. येथून भाजपचे नारायण राणे यांची निवडणूक लढण्याची इच्छा आहे. मात्र शिंदे गटाचे किरण सामंत ही येथून लढण्यास आग्रही आहेत. किरण सामंत यांचे बंधू व मंत्री उदय सामंत यांनीही अनेक वेळा नागपूरमध्ये फडणवीस यांची भेट घेतली. दीपक केसरकर यांचा कमी झालेला राणे विरोध हे फडणवीस यांच्या भेटीनंतरचे फळ असल्याचे बोलले जाते.
अमरावती येथून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून विरोध झाला होता. त्यानंतर राणा दाम्पत्यांने तातडीने फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर झाली, अर्ज भरण्यासाठी फडणवीस यांच्यासह अमरावतीचे भाजप पदाधिकारीही उपस्थित होते हे येथे उल्लेखनीय.