Wife Killed Husband: राजा रघुवंशी हत्या प्रकरण सध्या गाजत असताना आता उत्तर प्रदेशमध्ये आणखी एका प्रकरणाचा उलगडा झाला आहे. उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थ नगर पोलिसांनी मंगळवारी एका ४० वर्षीय महिलेला पतीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली. पत्नीने आधी पतीला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्या मित्राच्या मदतीने बलरामपूर जिल्ह्यातील राप्ती नदीत पतीला फेकले. पतीचा मृतदेह पोलिसांना आढळून आल्यानंतर पत्नी आणि तिच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. ज्यातून गुन्ह्याचा उलगडा झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता नामक आरोपी महिलेने पती कन्ननच्या आजारावर उपचार करण्यासाठी तिला बलरामपूरला नेले. तिथे तिचा प्रियकर अनिल शुक्ला (३०) याच्या मदतीने पतीचा खून केला. संगीता आणि अनिल गेल्या काही काळापासून संबंधात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सिद्धार्थ नगरचे सर्कल अधिकारी सुजीत कुमार राय यांनी सांगितले की, बलरामपूरमधील नदीकिनारी कन्नन याचा मृतदेह आढळून आला होता. कन्ननच्या कुटुंबियांनी त्याच्या कपड्यावरून मृतदेहाची ओळख पटवली. ढेबरुआ पोलीस ठाण्याचे प्रमुख गौरव सिंह यांनी म्हटले की, मृत कन्नन हा सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील नजरगढवा गावातील रहिवासी असून तो मच्छिमार होता. हत्येमधील आरोपी आणि पत्नीचा प्रियकर अनिल शुक्लाचे एका महिन्यापूर्वीच लग्न झाले होते, असेही पोलिसांनी सांगितले.

सुजीत कुमार राय यांच्या माहितीनुसार, ५ जून रोजी पत्नी संगीताने ढेबरूआ पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली. कन्नन २ जूनपासून बेपत्ता झाल्याचा दावा तिने केला. मात्र तपासादरम्यान संगीताच कन्ननबरोबर शेवटची दिसली असल्याचे समोर आले. तसेच ती त्याला कुठेतरी घेऊन जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पत्नी संगीताने आपला गुन्हा कबूल केला.

शुक्लासह कन्ननला एका गाडीतून बलरामपूरला नेले. तिथे त्याला अंमली पदार्थ पाजून बेशुद्ध करण्यात आले आणि नंतर नदीत फेकून दिले. पतीच्या भावाच्या तक्रारीनंतर पत्नी संगिता आणि तिचा प्रियकर शुक्लावर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुस्कान रस्तोगीच्या प्रकरणाची अजूनही चर्चा

दरम्यान उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला घडलेल्या मुस्कान रस्तोगी प्रकरणाचीही यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चा होत आहे. मुस्कान रस्तोगीने प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने पती सौरभ राजपूतची निर्घून हत्या केली होती. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये काँक्रिटसह पुरण्यात आले. खून केल्यानंतर मुस्कान आणि साहिल शुक्ला हिमाचल प्रदेशला पर्यटनासाठी गेले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर संबंध देशभरात खळबळ उडाली होती.