India Pakistan War Tensions : भारताने पाकिस्तानला उत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवत जोरदार हल्ले केले आहेत. भारताने पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले आणि अनेक दहशतवाद्यांच्या खात्मा केला आहे. सकाळी १० वाजता लष्कराची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यात नेमकं ऑपरेशन सिंदूर कसं राबवण्यात आलं याची माहिती देण्यात येईल.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी शुभमवर पहिली गोळी झाडण्यात आली
पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. त्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. याच हल्ल्यात शुभम द्विवेदीचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्यात गोळ्या झाडून त्याला ठार करण्यात आलं. शुभमचं दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. तो त्याच्या पत्नीसह आणि कुटुंबासह काश्मीरला फिरायला आला होता. मात्र २२ तारखेच्या दहशतवादी हल्ल्यात सर्वात आधी शुभमला ठार करण्यात आलं. आता ऑपरेशन सिंदूरनंतर शुभमच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे.
शुभम द्विवेदीच्या पत्नीने काय म्हटलं आहे?
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानते. माझ्या पतीच्या (शुभम) मृत्यूचा बदला त्यांनी घेतला आहे. मी खूप लहान आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी काय सांगणार? पण मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला आहे. मी खरोखरच त्यांची ऋणी आहे. शुभम आज जिथे कुठे असेल तिथे त्याच्या आत्म्याला आज शांती मिळाली असेल. असं म्हणत शुभम द्विवेदीच्या पत्नीने एअर स्ट्राईकबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
२२ एप्रिलच्या दुपारी काय घडलं होतं?
शुभम आणि त्याच्या पत्नीने दुपारी १ च्या सुमारास हॉटेल सोडलं. त्यानंतर ते घोडेस्वारीसाठी गेले होते. त्यांच्याबरोबरचे इतर कुटुंबीय हॉटेलमध्ये थांबले होते. शुभम आणि त्याची पत्नी फिरायला गेले असतानाच दहशतवाद्यांनी शुभमला गोळ्या झाडून ठार केलं. इश्याना असं शुभमच्या पत्नीचं नाव आहे. शुभमला तिच्या डोळ्यांदेखतच दहशतवाद्यांनी ठार केलं. शुभमचा भाऊ मनोज याने ही माहिती दिली आहे. शुभमचा चुलत भाऊ सौरभ याने ही माहिती दिली की शुभम आणि इशान्या यांचं लग्न १३ फेब्रुवारीला झालं होतं. दोघंही काश्मीरमध्ये कुटुंबीयांसह फिरायला गेले होते. त्याचवेळी ही घटना घडली. आता इश्याना द्विवेदी यांनी सरकारकडे शुभमला शहीद घोषित करावं अशी मागणी केली होती. आज इश्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.