US Nuclear Test : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावत आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेत जगातील अनेक देशांना धक्का दिला आहे. खरं तर ट्रम्प सातत्याने कोणत्या न कोणत्या निर्णयांमुळे कायम चर्चेत असतात. ट्रम्प यांनी नुकतीच अचानक एक मोठी घोषणा करत अमेरिकेच्या संरक्षण विभागाला (पेंटॅगॉन) तात्काळ अण्वस्त्र चाचणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते. या संदर्भात त्यांनी ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट देखील शेअर केली होती.
ट्रम्प यांच्या या आदेशाने जगात मोठी खळबळ उडाली. अमेरिका अण्वस्त्रांची चाचणी करणार का? याबाबत जगभरातून सवाल उपस्थित करण्यात आले. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांनी या संदर्भातील खुलासा केला आहे. अमेरिकेची अण्वस्त्र चाचणी करण्याची कोणतीही योजना नसल्याचं ख्रिस राईट यांनी सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
ख्रिस राईट यांनी काय सांगितलं?
“डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले आदेश हे अण्वस्त्रांच्या चाचणीच्या संदर्भातील नाहीत. तसेच ज्या चाचण्याचे आदेश दिले आहेत त्या चाचणीत अण्वस्त्र स्फोटांचा समावेश नसून त्या ऐवजी इतर भागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या संदर्भातील आहेत. मला वाटतं की आपण सध्या ज्या चाचण्यांबद्दल बोलत आहोत त्या सिस्टम चाचण्या आहेत. हे अण्वस्त्र स्फोट नाहीत. हे असे आहेत ज्यांना आपण नॉनक्रिटिकल स्फोट म्हणतो”, असं ख्रिस राईट यांनी सांगितलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय आदेश दिले होते?
“अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. माझ्या पहिल्या कार्यकाळात शस्त्रांचं संपूर्ण अद्ययावतीकरण आणि नूतनीकरण यासह हे साध्य झालं. प्रचंड विध्वंसक शक्तीमुळे मला ते करण्याचा तिरस्कार वाटला. पण पर्याय नव्हता! रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु ५ वर्षांच्या आतच ते समान आधारावर येतील. इतर देशांच्या चाचणी कार्यक्रमांमुळे मी युद्ध विभागाला समान आधारावर आमच्या अण्वस्त्रांची चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ती प्रक्रिया त्वरित सुरू होईल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवरील पोस्टमध्ये म्हटलं होतं.
