Bihar Election Result 2025 Prashant Kishor Uday Singh : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात एनडीएने तब्बल २०२ जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. राष्ट्रीय जनता दलाला २५ आणि काँग्रेसला केवळ सहा जागा जिंकता आल्या. दरम्यान, बिहारच्या जनतेला नवा पर्याय देऊ पाहणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना बिहारच्या जनतेने मोठा दणका दिला आहे. प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष एकही जागा जिंकू शकला नाही.

दरम्यान, प्रशांत किशोर यांच्यासमोर आता लोकांच्या टीकेचं आव्हान उभं राहिलं आहे. कारण, प्रशांत किशोर यांनी निवडणुकीआधी दावा केला होता की बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हा पक्ष २५ पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही. तसं झाल्यास मी राजकारण सोडून देईन. मात्र, संयुक्त जनता दलाने तब्बल ८५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांवरून प्रशांत किशोर यांना प्रश्न विचारला जात आहे की तुम्ही राजकारण कधीपासून सोडताय? प्रसारमाध्यमं देखील प्रशांत किशोर यांच्यासमोर यावरून प्रश्न उपस्थित करत आहेत. यावर आता जनसुराज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रशांत किशोर राजकारण सोडणार नाहीत : जनसुराज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह

उदय सिंह म्हणाले, “अजिबात नाही, प्रशांत किशोर राजकारण सोडणार नाहीत. उलट काही लोकांना वाटतंय की त्यांनी राजकारण सोडावं. प्रशांत किशोर यांच्यासारख्या व्यक्तीचा आणि जन सुराज पार्टीचा अंत व्हावा असं तुम्हाला (प्रसारमाध्यमं व सत्ताधारी) वाटत असेल. तसं झाल्यास तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्ही यावर जोर का देताय? त्यांनी राजकारण का सोडावं? हे सगळं खूप आश्चर्यजनक आहे.”

प्रशांत किशोर यांचा नितीश कुमारांच्या जदयूबाबतचा दुसरा अंदाज चुकला

प्रशांत किशोर यांनी याआधी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी अंदाज व्यक्त केला होता की, जदयू सहापेक्षा कमी जागांवर विजयी होईल, परंतु, जदयूने १२ जागा जिंकून प्रशांत किशोर यांच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केली होती. तज्ज्ञांच्या मतानुसार तेव्हापासून बिहारमधील राजकीय परिस्थिती बदलली आहे. भाजपा व जदयूने राज्यातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी जोर लावला. त्यात त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ मिळाली.