उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील निघासन ठाणे क्षेत्रातील एका गावात १५ आणि १७ वर्षीय बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर या दोन्ही बहिणींचे मृतदेह झाडावर लटकवण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी सहा आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींपैकी पाचजण मुस्लिम तर एकजण हिंदू आहे. या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

बुधवारी, दुपारी २ वाजताच्या सुमारास आरोपी या दोन्ही बहिणींना बळजबरीने आपल्यासोबत उसाच्या शेतात घेऊन गेले. तेथे त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह एका झाडावर टांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी छोटू, जुनेद, सोहेल, हफिजुल रहेमान, करीमुद्दीन आणि आरीफ या सहा जणांना अटक केली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत जुनेद जखमी झाला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे लखीमपूरचे पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितले. दरम्यान, सर्व आरोपींना फाशी, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि भरपाई अशी मागणी पीडित बहिणींच्या कुटुंबीयांनी केली आहे.

विरोधक आक्रमक

यानंतर अखिलेश यादव, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मायावती यांनी उत्तरप्रदेश सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेता राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलंय, “लखीमपूरमध्ये भर दिवसा दोन अल्पवयीन बहिणींचे अपहरण करून त्यांची हत्या केली जाते, ही अतिशय संतापजनक घटना आहे. बलात्कार करणाऱ्यांना मुक्त करून त्यांचा सन्मान करणाऱ्यांकडून महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. आपल्याला आपल्या बहिणी-मुलींसाठी देशात एक सुरक्षित वातावरण तयार करायला हवे.”

दरम्यान, प्रियंका गांधी म्हणाल्या, “लखीमपूरमध्ये घडलेली दोन बहिणींच्या हत्येची घटना हृदयद्रावक आहे. त्या मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. वृत्तपत्र आणि टीव्हीवर रोज खोट्या जाहिराती दिल्याने कायदा व सुव्यवस्था चांगली होत नाही. यूपीमध्ये महिलांवरील गंभीर गुन्हे का वाढत आहेत? या सरकारला कधी जाग येणार?”

हेही वाचा : “शिंदेंनी शिवसेनेबरोबरच महाराष्ट्राशी गद्दारी केली आणि फडणवीसांनी केंद्रातील भाजप सरकारला ‘रिटर्न गिफ्ट’ दिले”

तर, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती म्हणाल्या, “लखीमपूर खेरीमध्ये आईसमोरच दोन दलित बहिणींचे अपहरण आणि अत्याचार करून त्यांचे मृतदेह झाडाला लटकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशा दुःखद आणि लज्जास्पद घटनांची जितकी निंदा करावी तितकी कमी आहे. या घटनेने यूपीमधील कायदा आणि सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकारचे दावे उघड झाले आहेत.”

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, ‘योगी सरकारमध्ये गुन्हेगार दररोज महिलांना त्रास देत आहेत. हे खूपच लज्जास्पद आहे. सरकारने या घटनेची योग्य चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करावी. लखीमपूरमधील शेतकऱ्यांनंतर आता दलितांच्या हत्या ही ‘हाथरस की बेटी’ हत्याकांडाची घृणास्पद पुनरावृत्ती आहे.’

हेही वाचा : …तर नोटांवरही मोदींचाच फोटो छापला असता; अहमदाबादेतील कॉलेजला पंतप्रधानांचे नाव देण्याने वाद

लखीमपूर खेरी घटनेवर उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री जितिन प्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘लखीमपूरची घटना अत्यंत वेदनादायी, दुःखद आहे. दोन निष्पाप मुलींसोबत जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे. आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस कडक कारवाई करत असून, या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याला सोडले जाणार नाही. अशा घटना घडू नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील असून सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच मृत मुलींच्या कुटुंबासाठी पक्के घर तयार करून त्यांची शेतजमीन भाडेतत्त्वावर देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात तपास करून, महिन्याभराच्या आत दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.

नेमकं काय घडलं?

जुनेद आणि सोहेल यांचे दोन्ही बहिणींशी प्रेमसंबंध होते. दोघी बहिणी वारंवार त्यांच्याकडे लग्नाची मागणी करत होत्या. याला कंटाळून जुनेद आणि सोहेल यांनी त्यांचा काटा काढायचे ठरवले. आपल्या साथीदारांच्या मदतीने त्यांनी दोन्ही बहिणींना घरातून खेचत बाहेर आणले. यावेळी त्यांनी मुलींच्या आईलाही बेदम मारहाण केली. उसाच्या शेतात घेऊन जाऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर दोघींची हत्या करून मृतदेह झाडाला टांगून ठेवले.