Vladimir Putin On Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील संघर्ष तब्बल दोन वर्षांपासून सुरू आहे. दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन सातत्याने एकमेकांच्या शहरांवर हवाई हल्ले करत आहेत. या संघर्षामुळे लाखो युक्रेनियन लोक विस्थापित झाले आहेत. तसेच या दोन्ही देशातील संघर्षाचा जगभरातील अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे. खरं तर रशिया- युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नला यश येताना दिसत नाहीये.
काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात एक बैठक झाली होती. त्या बैठकीत रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा निघण्याची शक्यता होती. मात्र, त्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी आता रशिया-युक्रेन संघर्षाबाबत एक मोठं विधान करत युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासमोर एक नवा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी पुन्हा एकदा सांगितलं की युक्रेन बरोबरच्या संघर्षात रशियाचा हेतू प्रादेशिक विस्तार करणं नाही, तर लोकांच्या हक्कांचं रक्षण करणं आहे. तसेच व्लादिमीर पुतिन यांनी यावेळी स्पष्ट केलं की, युक्रेनच्या नाटोमध्ये सहभागी होण्यास रशियाचा विरोध आहे. मात्र, आपण झेलेन्स्कीला भेटण्यास तयार आहेत. पण त्यांना भेटण्यात काही अर्थ आहे का? जर त्यांना शांततेसाठी भेटायचं असेल तर त्यांनी मॉस्कोला यावं, असा प्रस्तावही व्लादिमीर पुतिन यांनी यावेळी ठेवला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, व्लादिमीर पुतिन म्हणाले की, झेलेन्स्की हे मान्य करतात की प्रत्येक देशाला स्वतःच्या सुरक्षेची हमी देण्याचा अधिकार आहे. ज्यामध्ये युक्रेनचाही समावेश आहे. मग हेच तत्व रशियाच्या सुरक्षेला देखील लागू होतं असंही पुतिन यांनी म्हटलं. तसेच आम्ही युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्यास विरोध करतो. पण पूर्वेकडे होणारा विस्तार रशियन हितसंबंधांना धोका निर्माण करत असल्याचंही ते म्हणाले.
पुतिन पुढे म्हणाले की, जर ज्ञानाचा वापर झाला तर सध्याच्या अमेरिकन प्रशासनाच्या तोडग्याच्या आवाहनाला पाहता शांततापूर्ण तोडगा काढणं शक्य आहे. शांततापूर्ण उपाय नाही निघाला तर संघर्ष लष्करी पद्धतीने सोडवावा लागेल, असा इशाराही पुतिन यांनी दिला. तसेच युक्रेन युद्धासाठी पुतिन यांनी पाश्चात्य देशांना जबाबदार धरलं.