तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी सोमवारी केंद्र सरकारवर पश्चिम बंगालच्या मनरेगा योजना, पंतप्रधान आवास योजना आणि राष्ट्रीय आरोग्य योजनेचे थकबाकी निधी रोखल्याचा आरोप केला होता. तसंच, हा निधी तत्काळ देण्याचीही विनंती केली होती. यावर, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे.
लोकसभेत शून्य प्रहारात मुद्दा उपस्थित करताना बंदोपाध्याय म्हणाले, मनरेगा योजना, पंतप्रधान आवास योजना आणि पश्चिम बंगालसाठी राष्ट्रीय आरोग्य योजनेसाठी दिलेला निधी केंद्राने थांबवला आहे. केंद्राने गेल्या दोन वर्षांपासून पश्चिम बंगालची १८ हजार कोटींची थकबाकी भरलेली नाही. तृणमूल काँग्रेसचे काही खासदार केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात मागण्या करण्यासाठी दिल्लीत गेले तेव्हा त्यांना दोन तास वाट पाहावी लागली. त्यानंतरही मंत्र्यांची भेट घेता आली नाही. त्यामुळे, कोणताही विलंब न करता हा पैसा पश्चिम बंगालला देण्यात यावा. आम्हाला आमचं मत पंतप्रधानांपर्यंत पोहोचवायचं आहे, असं बंदोपाध्याय म्हणाले.
यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा हा दावा वस्तुस्थितीनुसार योग्य नाही. भारत सरकारने दिलेला पैशांचा पश्चिम बंगाल सरकारकडून गैरवापर केला जातो. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान पोषण योजनेत ४ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सरकारने सोपवले असून यातून लवकरच सत्य बाहेर येईल.
तृणमूल काँग्रेस गरिबांचा पैसा लुटतात, त्यांची चौकशी झाली पाहिजे, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले. त्यांचे अर्धा डझन मंत्री तुरुंगात आहेत. त्यांचे शिक्षणमंत्री तुरुंगात आहेत, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. तसंच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं थेट नाव न घेता पक्षाचे नेतृत्व तुरुंगात जातील अशी तृणमूलच्या नेत्यांना असल्याचंही ते म्हणाले. म्हणूनच ते संसदेचा वेळ वाया घालवतात, असंही प्रधान म्हणाले.