विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे वैद्यकीय रजेवर आहेत. ते आता श्रीनगर या ठिकाणी रवाना झाले आहेत. गेल्या महिन्यात बालाकोटवर जो एअरस्ट्राईक करण्यात आला त्यानंतर पाकिस्तानच्या काही लढाऊ विमानांनी भारतीय हवाई सीमेत घुसखोरी केली. त्यातील एका विमानाचा पाठलाग करताना विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या सीमेत जाऊन पोहचले. त्यांनी पाकिस्तानचे F-16 हे विमान पाडले देखील. त्यानंतर मात्र त्यांचे MIG 21 हे विमान अपघातग्रस्त झाले.

त्यानंतर अभिनंदन हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले. पाकिस्तानच्या तावडीतून सुमारे ५५ तासांनी त्यांची सुटका झाली. त्यांचे शौर्य अतुलनीय आहे यात काहीही शंकाच नाही. ते भारतात परतल्यावर सगळ्या भारताने जल्लोष केला. त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. डॉक्टरांनी त्यांना चार आठवड्यांची वैद्यकीय रजा घेण्यास सांगितले आहे. या चार आठवड्यांच्या वैद्यकीय रजेसाठी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी चेन्नई येथील आपले घर न निवडता श्रीनगर येथील त्यांच्या हवाई तळाजवळ जाणे निवडले आहे. आजच अभिनंदन श्रीनगरला रवाना झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

खरंतर विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना चार आठवड्यांच्या वैद्यकीय रजेदरम्यान त्यांच्या घरी रहाण्याच्या, घरातल्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याची निवड ते निश्चितच करू शकले असते. मात्र त्यांनी घराचा पर्याय न निवडता आपल्या एअर फोर्सच्या तळाजवळचा पर्याय निवडला अशी माहिती वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.