भारतीय जनता पार्टीचे खासदार रवी किशन यांनी स्वत:ला चार आपत्य असल्यासंदर्भात भाष्य करताना भाजपाच्या आधी सत्ता असलेल्या काँग्रेसच्या नियोजनशून्य कारभाराला जबाबदार ठरवलं आहे. अजेंडा आज तक २०२२ या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले गोरखपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार रवी किशन यांनी लोकसंख्या नियंत्रण विधेयकासंदर्भात मतप्रदर्शन केलं. यापूर्वीच्या सरकारने यासंदर्भात अधिक जागृत राहणं आवश्यक होतं. त्यांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला असता तर आज मला चार मुलं नसती, असं रवी शंकर यांनी म्हटलं आहे.

लोकसभेमध्ये आपण यासंदर्भातील चर्चेसाठीचा प्रस्ताव मांडणार आहोत असंही रवी शंकर म्हणाले. इतकच नाही तर आता आपण जेव्हा लोकसंख्या वाढीबद्दल विचार करतो तेव्हा चार मुलं असल्याचा पश्चाताप होतो, असंही रवी शंकर यांनी या कार्यक्रमात म्हटलं. “काँग्रेसने यापूर्वीच विधेयक आणलं असतं तर आम्ही थांबलो असतो. मला चार मुलं आहेत पण ही काही चूक नाही. काँग्रेसने आधीच विधेयक आणलं असतं आणि असा कायदा असता तर आम्हाला चार मुलं नसती,” असंही रवी शंकर म्हणाले.

काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातील कायद्याबद्दल फार गांभीर्याने विचार करण्याची गरज होती. “यासाठी काँग्रेसला दोषी धरलं पाहिजे कारण तेव्हा सत्तेत त्यांची सरकार होती,” असं लोकसंख्या नियंत्रण कायद्यासंदर्भात स्वत:च्याच चार मुलांचा उल्लेख करत रवी शंकर यांनी सांगितलं. तसेच “आम्हाला याची कल्पना नव्हती”, असंही लोकसंख्येसंदर्भातील भाष्य करताना भाजपा खासदाराने म्हटलं.

नक्की वाचा >> क्रिकेटमुळे भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील का? मोदींच्या मंत्रीमंडळातील परराष्ट्र मंत्री म्हणाले, “आपण जोपर्यंत…”

किशन यांनी चीनचा उल्लेख करताना चीनने लोकसंख्या नियंत्रणात आली आहे, असं म्हटलं. आधीच्या सरकारने विचापूर्वक निर्णय घेतले असते तर अनेक पिढ्यांना हा संघर्ष करावा लागला नसता. आता या विषयावरुन आरोप प्रत्यारोप होतील मात्र त्याचा आता काहीही उपयोग नाही. या कायद्याचं फलित २० ते २५ वर्षांपूर्वीच दिसायला हवं होतं, असंही रवी किशन यांनी म्हटलं.

रवी किशन यांनी विद्यमान सरकार केवळ मंदिरं उभारत नसल्याचं सांगताना रस्त्यांची मोठ्या प्रमाणात बांधणी झाल्याचं म्हटलं. तसेच इकॉमिक कॉरिडोअर निर्माण करताना शिक्षणसंस्थांचीही निर्मिती करण्यात आल्याचं रवी किशन यांनी म्हटलं.