Crime News : २३ वर्षांच्या एका महिलेने तिच्यावर बलात्कार होऊ नये म्हणून धावत्या ट्रेनमधून उडी मारली आहे. एका माणसाने ट्रेनमधल्या कोचमध्ये तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेने हे पाऊल उचललं. रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

कुठे घडली ही घटना?

महिलेने ट्रेनमधून उडी मारण्याची ही घटना हैदराबाद या ठिकाणी घडली आहे. दरम्यान यामुळे महिलेचा अपघात झाला आहे आणि तिला जखमा झाल्या आहेत. तिच्यावर हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी महिलेने पोलिसांना नेमकं काय सांगितलं?

अपघातग्रस्त महिलेने या संपूर्ण घटनेसंदर्भात पोलिसांकडे जबाब नोंदवला. तिने सांगितलं, २२ मार्चच्या दिवशी ती MMTS या ट्रेनने मेडचल या ठिकाणी चालली होती. ट्रेनमधील महिलांच्या डब्यात ती बसली होती. इतर दोन महिलाही त्या महिल्यांच्या डब्यात होत्या. अलवल हे रेल्वे स्टेशन आल्यावर त्या उतरल्या. ज्यानंतर ती महिला डब्यात एकटीच होती. ट्रेन सुटणार होती त्यावेळी एक अज्ञात माणूस तिथे आला. त्याने तिच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. तिने त्याला सपशेल नकार दिला आणि त्याला तिथून जाण्यास सांगितलं तेव्हा तो माणूस जबरदस्ती करु लागला. तोपर्यंत ट्रेन सुटली. ज्यानंतर या महिलेने स्वतःचा बचाव करण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी टाकली.

उडी टाकल्यानंतर महिलेचा अपघात

२३ वर्षांच्या या महिलेचा ट्रेनमधून उडी घेतल्याने अपघात झाला. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर, डोक्यावर जखमा झाल्या. तसंच तिच्या उजव्या हाताला दुखापत झाली. तसंच तिच्या कमरेवरही मुका मार लागला. ज्यानंतर जीआरपींनी तिला रुग्णालयात दाखल केलं. या महिलेने उडी का मारली? हे विचारलं असता तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला, त्यापासून बचाव करत उडी मारल्याचं या महिलेने सांगितलं. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी काय सांगितलं?

महिलेचा जबाब नोंदवून घेतल्यावर पोलिसांनी त्या अज्ञात तरुणाला शोधण्यासाठी कसून तयारी सुरु केली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसंच खबऱ्यांचं नेटवर्कही पोलिसांनी कामाला लावलं आहे. सध्याच्या घडीला जखमी झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु आहेत. तसंच या महिलेने पोलिसांना सांगितलं आहे की तो माणूस कोण होता ते मी ओळखू शकते. दरम्यान पोलिसांनी हेदेखील सांगितलं जेव्हा या महिलेने उडी मारली तेव्हा ती पडली आणि तिचा अपघात झाला. पण तिला आम्ही रुग्णालयात आणलं तेव्हा ती घडल्या प्रकारामुळे खूप घाबरुन गेली होती. सदर प्रकरणात आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत.