एक आई आपल्या मुलांसाठी संपूर्ण जगाशी झगडू शकते. मात्र नोएडा येथील एका आईला आपल्या मुलाच्या मृत्यूचं कारण व्हावं लागलं. याच्यामागची वेदनादायी कहाणी आता दोघांच्या मृत्यूनंतर उलगडली आहे. आपल्या मुलाच्या मानसिक आजारामुळं त्रस्त होऊन त्याच्या पिडा कायमच्या संपविण्यासाठी आईनं मुलासह १३ व्या मजल्यावरून उडी घेतली. ग्रेटर नोएडाच्या सिटी सोसायटी इमारतीमधील हे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचं हृदय पिळवटून निघालं.

मानसिक आजारानं ग्रस्त असलेल्या मुलाला नेहमी औषधावर अवलंबून राहावं लागत होतं. त्याच्या वेदना आईला पाहावत नव्हत्या. बिसरख पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव साक्षी चावला (३७) आहे. त्यांचा मुलगा दक्ष चावला (११) वर त्यांचे आतोनात प्रेम होतं. मात्र त्याच्या आजारापणामुळं त्या मानसिकदृष्ट्या खालावल्या होत्या. मुलाला बरं करण्यासाठी त्यांनी अनेक वैद्यकीय सल्ले, उपचार घेऊन पाहिले. पण मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० वाजता सोसायटीच्या खालच्या आवारात काही लोकांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. घाबरलेले लोक खिडक्यांजवळ धावले. तेव्हा खाली साक्षी चावला आपल्या मुलासह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांच्या मृत्यूनंतर सोसायटीत घबराट पसरली.

घरात मिळाली सुसाइड नोट

या घटनेनंतर पोलीस सोसायटीत पोहोचले. त्यांनी चावला यांच्या घराची झडती घेतली असता साक्षी चावला यांची सुसाइड नोट आढळून आली. त्यांनी पती दर्पण चावलाच्या नावाने ही चिठ्ठी लिहिली होती.

यात त्यांनी लिहिले, “आम्ही हे जग सोडून जात आहोत. सॉरी, आम्ही तुम्हाला आणखी त्रास देऊ इच्छित नाही. आमच्यामुळे तुमचे आयुष्य उध्वस्त होऊ नये. आमच्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही.”

या घटनेनंतर चावला यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, दक्षवर अनेक वर्षांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या पालकांनी औषधोपचार, देवधर्म सर्व काही केलं. दक्ष शाळेतही जाऊ शकत नव्हता. त्याला औषधांवर अवलंबून राहावं लागत होतं. यामुळे साक्षी चावला अनेक वर्षांपासून तणावात होत्या.

घटनेच्या दिवशी काय झालं?

पोलिसांच्या चौकशीत समजले की, शनिवारी सकाळी ९ वाजता दर्पण चावला यांनी साक्षी यांना मुलाला औषध देण्यासाठी सांगितलं. यानंतर साक्षी यांनी मुलाला औषध दिलं आणि त्या बाल्कनीत फिरत होत्या. यानंतर दर्पण दुसऱ्या खोलीत जाऊन आराम करत होते. काही वेळानं आई आणि मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी घेतल्याचं त्यांना समजलं. पोलिसांच्या माहितीनुसार, दर्पण चावला चार्टड अकाऊंटट असून ते मुळचे उत्तराखंडचे राहणारे होते.