आकाशातून खाली झेपावण्यासाठी तिने विमानातून उडी घेतली़  मात्र ऐन वेळी पाठीवरच्या पॅराशूटने धोका दिला आह़े  ती थेट जमिनीवर आदळून ठार झाली़  येथील वापरात नसलेल्या कमालापुरम विमानतळाजवळ गुरुवारी ही हृदयद्रावक घटना घडली़
रम्या नावाच्या २४ वर्षीय तरुणीने अन्य दोघांसह ‘स्कायडायव्हिंग’ करण्यासाठी विमानातून आकाशात उडी घेतली़  दहा हजार फूट अंतरावर आल्यानंतर तिने पॅराशूट उघडण्यासाठी कळ दाबलीही, मात्र आयत्या वेळी ते उघडलेच नाही़  त्यानंतर तिने तिचे राखीव पॅराशूट उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु तोही प्रयत्न यशस्वी झाला नाही, असे मित्तूर येथील साहाय्यक जिल्हाधिकारी अनुश यांनी सांगितल़े
हा थरारक प्रसंग घडताना महिलेचे पतीही तिथे उपस्थित होत़े  त्यांनी तातडीने रम्याला रुग्णालयात नेले, परंतु तिचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल़े  हे दाम्पत्य बंगळुरू येथील ‘इंडियन स्कायडायव्हिंग अ‍ॅण्ड पॅराशूट असोसिएशन’चे सदस्य होत़े  या संस्थेकडून गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी स्कायडायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात येत होत़े  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रम्याच्या पतीने या प्रकरणी तक्रार केली असून, त्यानुसार संस्थेविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े