Crime News उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाची हुंडाबळीची घटना मन सून्न करणारी आहे.पतीने हुंड्यासाठी आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात घडली असून हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने पतीने विवाहित महिलेची निर्घृण हत्या करत तिला जाळून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृत महिलेची ओळख निक्की अशी असून तिचा विवाह डिसेंबर २०१६ मध्ये विपिन नावाच्या व्यक्तीबरोबर झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर ग्रेटर नोएडामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात विपीनला अटक करण्यात आली आहे. विपीनची अटकेच्या आधीची पोस्ट चर्चेत आली आहे. निक्कीची हत्या झाली नसून तिने आत्महत्या केली आहे असं विपीनने म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात विपीनला अटक केली आहे.
काय आहे घटना? निक्कीच्या बहिणीचा आरोप काय?
मृत महिलेच्या बहिणीने म्हटलं की, “आमचा दोघींचाही छळ होत होता. आमच्या सासरचे लोक आम्हाला सांगायचे की ३६ लाख रुपये घेऊन या. गुरुवारी पहाटे १.३० ते ४ च्या दरम्यान माझ्यावरही हल्ला झाला. त्यांनी मला सांगितलं की, आम्हाला एका बहिणीसाठी हुंडा मिळाला, पण दुसऱ्याचं काय? आपण पुन्हा लग्न करू, मला अनेक वेळा मारहाण झाली आणि मी दिवसभर शुद्धीवर नव्हते”, असा आरोप तिने केला आहे. “त्याच संध्याकाळी माझ्या मुलांसमोर माझ्या बहिणीवर क्रूरपणे हल्ला केला. माझ्या डोळ्यांसमोर तिला जाळून टाकलं. मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मी काहीही करू शकले नाही. कोणीतरी तिला रुग्णालयात दाखल केलं. मी ते पाहून बेशुद्ध पडले होते. मला न्याय हवा आहे. माझ्या सासरच्यांनी माझ्या बहिणीला ज्या प्रकारे त्रास दिला तसाच त्रास त्यांना द्यावा अशी माझी इच्छा आहे”, असं ती म्हणाली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
विपीनची पोस्ट नेमकी काय?
निक्की, तू काय झालं आहे जगाला सांगत का नाहीस? तू आत्महत्या केली आहेस, पण आता सगळं जग मला खुनी म्हणेल. तू मला सोडून गेलीस पण आता जे काही माझ्यासह घडतं आहे ते काही चांगलं नाही. तुझ्या मृत्यूनंतर मी बरबाद झालो आहे. माझ्याकडे आता काहीही उरलं नाही. असं म्हणत विपिनने पोस्ट केली आहे. तसंच त्याने त्याचा आणि निक्कीचा हसतानाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. तसंच या व्हिडीओला बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून एक हिंदी गाणंही लावलं आहे.