Yash Dayal Arrest Stayed By Allahabad High Court: एका तरुणीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या एफआयआर प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा क्रिकेटपटू यश दयाल याच्या अटकेला स्थगिती दिली आहे. याबाबत लाईव्ह लॉने वृत्त दिले आहे.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळणाऱ्या यश दयालने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, दोघांची सुमारे पाच वर्षांपूर्वी भेट झाली होती, तेव्हापासून ते नातेसंबंधात होते.

२७ वर्षीय यश दयाल याच्यावर ६ जुलै रोजी गाझियाबाद जिल्ह्यातील इंदिरापुरम पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७६ (फसव्या मार्गाने लैंगिक संबंध इत्यादी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या आठवड्यात यश दयालने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेत त्याच्या अटकेला स्थगिती देण्याची आणि त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

पाच वर्षे मूर्ख बनवता येत नाही…

अलाहाबाद उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि न्यायमूर्ती अनिल कुमार यांच्या खंडपीठाने तोंडी निरीक्षण नोंदवले की, “एखाद्याला पाच वर्षे मूर्ख बनवता येत नाही.”

“तुम्हाला एक दिवस, दोन दिवस किंवा तीन दिवस मूर्ख बनवता आले असते, पण ५ वर्षे… तुम्ही ५ वर्षांपासून नात्यात आहात, ५ वर्षे कोणालाही मूर्ख बनवता येत नाही”, अशी तोंडी टिप्पणी खंडपीठाने केली. याबाबतचे वृत्त लाईव्ह लॉने दिले आहे.

यश दयालवरील आरोप

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत तरुणीने आरोप केला आहे की, यश दयालने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

“त्याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन वारंवार माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच त्याच्या कुटुंबीयांशी माझी ओळख करून दिली, ज्यांनी मी त्यांची सून होईन असे आश्वासन दिले. मी पूर्ण प्रामाणिकपणा आणि समर्पणाने हे नाते टिकवले”, असे आरोप तरुणीने तक्रारीत केले आहेत.

दुसरीकडे यश दयालने तरुणीचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानेही प्रयागराज पोलिसांकडे तरुणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. याचबरोबर त्याने पोलिसांकडे या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यश दयालने त्याच्या जबाबात आरोप केला आहे की, या तरुणीने त्याचा आयफोन आणि लॅपटॉप चोरला आहे. याचबरोबर खोट्या बहाण्याने त्याच्याकडून पैसे घेतले आहेत. या सर्व गोष्टींचे त्याच्याकडे पुरावे आहेत.