काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम रहावे अन्यथा जनमानसातील त्यांची प्रतिमा अधिक खराब होईल असे मत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. यशवंत सिन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रखर विरोधक समजले जातात. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळावर त्यांनी सातत्याने टीका केली आहे. यशवंत सिन्हा यांनी मागच्यावर्षी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.
काही काळ काँग्रेसचा कारभार अध्यक्षीय मंडळामार्फत चालवला जावा असा सल्लाही यशवंत सिन्हा यांनी दिला आहे. राहुल गांधी त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले नाहीत तर जनमानसातील त्यांची प्रतिमा अधिक खराब होईल. काही काळ पक्ष अध्यक्ष मंडळामार्फत किंवा अन्य कुठली व्यवस्था करावी असे यशवंत सिन्हा यांनी त्यांच्या टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे.
If Rahul Gandhi does not stand firm on his resignation, he will lose further in public estimation. Let the party be run by a presidium or any other arrangement at least for some time.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) May 30, 2019
यापू्र्वी यशवंत सिन्हा यांनी काँग्रेसने बिहार, झारखंड, दिल्ली आणि अन्यत्र आघाडी निश्चित करावी. आधीच भरपूर उशीर झाला आहे असे टि्वट केले होते. लोकसभा निवडणुकीत मोदी त्सुनामीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला. अजूनही ते त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी काँग्रेस आणि यूपीएच्या घटक पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. राहुल गांधी यांचा हा निर्णय काँग्रेस आणि घटक पक्षांसाठी आत्मघात ठरेल असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. यशवंत सिन्हा यांनी मात्र याउलट मत व्यक्त करताना राहुल गांधींनी राजीनामा दिला पाहिजे असे मत व्यक्त केले.