किच्चा सुदीप या दाक्षिणात्य अभिनेत्याला धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रात किच्चा सुदीपचा प्रायव्हेट व्हिडीओ लिक करण्याची धमकी देण्यात आली आहे. किच्चा सुदीप भाजपात जाणार अशा चर्चा होत्या. मात्र मी भाजपात जाणार नाही तर केवळ प्रचार करणार असल्याचं त्यानं सांगितलं. तो भाजपात जाण्याच्या चर्चा असतानाच त्याला धमकीचं पत्र आल्याने खळबळ उडाली होती. अशात आता किच्चा सुदीपची यासंदर्भातली प्रतिक्रिया समोर आली आहे. धमकी कुणी दिली ते मला ठाऊक आहे असं किच्चा सुदीपने म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे किच्चा सुदीपने?

“होय मला धमकी देणारं एक पत्र आलं आहे. मला हेदेखील ठाऊक आहे की हे धमकी देणारं निनावी पत्र मला कुणी पाठवलं आहे. आमच्या सिनेक्षेत्रातलीच ती व्यक्ती आहे. या पत्राला मी जशास तसं उत्तर देणार आहे. सध्या मी अशा लोकांमुळे शांत आहे जे लोक माझ्या कठीण काळात माझ्यासोबत उभे होते. ” अशी प्रतिक्रिया किच्चा सुदीपने दिली आहे.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं अशातच त्याला एक धमकीचं पत्र आल्याने खळबळ उडाली. किच्चा सुदीपच्या मॅनेजरने हे पत्र स्वीकारलं. मात्र हे धमकीचं पत्र असेल याची त्याला कल्पना नव्हती. आता या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

किच्चा सुदीपच्या मॅनेजरने काय माहिती दिली?

किच्चा सुदीपचा मॅनेजर जॅक मंजू याने ही माहिती दिली की किच्चा सुदीपच्या नावे एक निनावी पत्र आलं आहे. त्यात किच्चा सुदीपचा प्रायव्हेट व्हिडीओ लिक करण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या पत्राची अभिनेत्याने आणि त्याच्या मॅनेजरने दखल घेतली आहे आणि या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली आहे. या पत्रात किच्चा सुदीपविषयी अपमानजनक भाषाही वापरण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे किच्चा सुदीप?

किच्चा सुदीप हा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आहे. २ सप्टेंबर १९७३ ला सुदीपचा जन्म शिमोगामध्ये झाला. किच्चा सुदीपने बंगळुरूच्या इंजिनिअरींग महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. शालेय जीवनापासूनच सुदीप खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतो. मात्र आपण चंदेरी दुनियेत गेलं पाहिजे असं त्याला वाटू लागलं. त्यानंतर त्याने अॅक्टिंगचं प्रशिक्षण घेतलं आणि मग सिने जगतात तो आला. किच्चा सुदीपने कन्नड, तेलुगू आणि हिंदी भाषेतल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. बाहुबली सिनेमातल्या त्याच्या रोलची चर्चा झाली होती. विक्रांत रोणा हा सिनेमाही चांगलाच गाजला.