उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचा संकल्प योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. उत्तर प्रदेशात बेरोजगार तरुणांची संख्या खूप आहे तसेच रोजगार नसल्यामुळे स्थलांतराचे प्रमाणही भरपूर आहे. युवकांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल असे आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन म्हटले आहे.  उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्व समाजाच्या विकासासाठी आपण अहोरात्र काम करू असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

भारतीय जनता पक्षाने प्रचाराच्या वेळी सबका साथ सबका विकास हा नारा दिला होता परंतु त्यांनी कट्टर हिंदुत्ववादी नेत्याची मुख्यमंत्री म्हणून निवड केली, अशी टीका विरोधकांनी केली होती. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर आदित्यनाथ काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. सबका साथ सबका विकास हा नारा देऊन आपणही विकासाचेच राजकारण करणार आहोत असा संदेश आदित्यनाथ यांनी दिला आहे. समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदित्यनाथ यांना शुभेच्छा दिल्या.

उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवण्याचे काम आदित्यनाथ योग्यरित्या पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या मुद्दावर निवडून आला आहे. त्यामुळे भाजप सर्वांना घेऊन प्रगती साधेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. उत्तर प्रदेशातील जनतेच्या आशा आकांक्षा विकासामध्ये रुपांतरित करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कार्यालयीन ट्विटर अकाउंटवरुन म्हटले आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले प्रत्येक वचन पाळले जाईल असे ते म्हणाले.

सर्वात आधी उत्तर प्रदेशातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला जाईल असे ते म्हणाले. युवकांना रोजगार मिळणे अत्यावश्यक असून त्यासाठी कौशल्याचा विकास होण्याची आवश्यकता आहे. कौशल्य विकास केंद्राची संख्या वाढवण्यावर आपण भर देणार आहोत असे ते म्हणाले. युवकांसमोर नोकरीचे अनेक पर्याय खुले झाले पाहिजे असे ते म्हणाले. त्या दिशेने उत्तर प्रदेश सरकार पावले टाकणार आहे. कौशल्य विकास केंद्रातूनच त्यांची ‘प्लेसमेंट’ होईल याकडे आम्ही लक्ष देऊ असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या समस्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.